तारीख पे तारीख! अखेर आयटीयन्सची प्रतीक्षा संपणार; हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोसाठी नवा मुहूर्त


पुणे : हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोची आतुरतेने वाट पाहणाऱ्या पुणेकरांसाठी आणि विशेषतः आयटी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी दिलासादायक अपडेट समोर आली आहे. या मार्गावरील मेट्रो सेवा नेमकी कधी सुरू होणार, याची प्रतीक्षा आता संपण्याची शक्यता आहे. सप्टेंबरच्या पहिल्या पंधरवड्यात, म्हणजेच 5 ते 15 सप्टेंबरदरम्यान मेट्रो सेवा सुरू करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

या प्रकल्पाच्या उद्घाटनासाठी प्रशासनाकडून हालचालींना वेग आला असून, अंतिम तारीख निश्चित करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

माण-बालेवाडी मार्गाला सुरक्षा मंजुरी

हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो प्रकल्पातील पहिल्या टप्प्याला मोठा दिलासा मिळाला आहे. माण ते बालेवाडी या टप्प्यातील 12 स्थानकांवर प्रवासी सेवा सुरू करण्यासाठी मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्तांकडून (CMRS) 23 जुलै रोजीच मंजुरी मिळाली आहे. मात्र उद्घाटनाची तारीख निश्चित न झाल्याने अद्याप प्रत्यक्ष प्रवासी सेवा सुरू झालेली नाही.

माण आणि हिंजवडी येथे मेट्रोसाठी आधुनिक डेपो उभारण्यात आले आहेत. तसेच स्थानकांच्या एकूण वीज गरजेपैकी सुमारे एक-तृतीयांश वीज रूफटॉप सोलर सिस्टीमच्या माध्यमातून निर्माण करण्याचे नियोजन आहे.

उद्घाटनाच्या तारखा वारंवार पुढे ढकलल्या

या प्रकल्पाची मूळ अंतिम मुदत मार्च 2025 होती. मात्र त्यानंतर उद्घाटनासाठी सप्टेंबर 2025, डिसेंबर 2025, मार्च 2026, मे, जून आणि 15 ऑगस्ट 2026 अशा विविध मुदती समोर आल्या. मात्र या तारखांनंतरही सेवा सुरू होऊ शकली नाही.

आता सप्टेंबरच्या पहिल्या पंधरवड्यात मेट्रो सुरू करण्याचे नियोजन आहे. दरम्यान, संपूर्ण प्रकल्पाची मुदत मार्च 2026 वरून मार्च 2027 पर्यंत वाढवण्यात आल्याची माहिती आहे.

PMRDAकडून काय सांगण्यात आलं?

“मेट्रो सेवा लवकरात लवकर सुरू करणे हे आमचे प्राधान्य आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री कार्यालयाला पत्र पाठवले असून सप्टेंबरच्या पहिल्या पंधरवड्यात ही सेवा सुरू होण्याची दाट शक्यता आहे,” अशी माहिती पीएमआरडीएचे आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी दिली.

त्यामुळे आता 5 ते 15 सप्टेंबरदरम्यान हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो प्रत्यक्ष प्रवाशांच्या सेवेत दाखल होते का, याकडे पुणेकरांचे लक्ष लागले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!