नागपुरात अंधश्रद्धेचा काळा चेहरा! इंजिनिअर तरुणीच्या मृत्यूनंतर धक्कादायक आरोपांचा स्फोट

नागपूर : “मला घरी घेऊन जा… फोन तरी उचला…” ओक्साबोक्शी रडत केलेली विनवणी, मानसिक त्रासाने खचलेली अवस्था आणि उपचाराऐवजी ‘महाराजां’च्या नावावर चाललेला दबाव… नागपुरातील एका उच्चशिक्षित तरुणीच्या मृत्यूनंतर समोर आलेल्या आरोपांनी समाजाला हादरवून सोडले आहे.

नागपूरातील 28 वर्षीय रिया गंधेवार हिचा 10 एप्रिल 2026 रोजी मेंदू ज्वराने मृत्यू झाला. इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशनमध्ये इंजिनिअरिंग केलेल्या रियाचे 2021 मध्ये गडचिरोलीतील सुमित गंधेवार याच्यासोबत लग्न झाले होते. सुशिक्षित कुटुंबातील हे लग्न पुढे अंधश्रद्धा, मानसिक छळ आणि दबावाच्या आरोपांमुळे चर्चेत आले आहे.
रियाच्या आई माधुरी पोतवार यांनी गंभीर आरोप करत सांगितले की, लग्नानंतर रियाला मानसिक तणाव आणि डिप्रेशनचा त्रास सुरू झाला होता. मात्र डॉक्टरांकडे उपचार करण्याऐवजी सासरच्या मंडळींनी एका स्वघोषित महाराजांचा आधार घेतला. चामोर्शीजवळील हरणघाट येथील कार्तिक स्वामी महाराजांकडे रियाला काही दिवस राहण्यासाठी वारंवार दबाव टाकण्यात येत होता, असा दावा त्यांनी केला आहे.

याचबरोबर रियाच्या जेवणात चोरून विभूती मिसळली जात असल्याचाही आरोप करण्यात आला आहे. कुंडली न जुळल्याने भविष्यात होणारी मुले अपंग जन्माला येतील, अशी भीती रियाच्या मनात घालण्यात आली होती, असेही तिच्या आईने सांगितले.

दरम्यान, रियाचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून त्यामध्ये ती पतीशी संपर्क साधण्यासाठी रडत विनवण्या करताना दिसत आहे. या व्हिडिओंमुळे प्रकरण अधिक संवेदनशील बनले आहे.
उच्चशिक्षित कुटुंबातही अंधश्रद्धेचा प्रभाव किती खोलवर रुजला आहे, यावरून या घटनेनंतर प्रश्न उपस्थित होत आहेत. वैद्यकीय उपचारांऐवजी तथाकथित आध्यात्मिक उपायांवर भर देण्यात आल्याचा आरोप होत असताना, या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणीही जोर धरू लागली आहे.