डीजेवरचा डान्स ठरला जीवघेणा! पत्नीची हत्या करून पतीची आत्महत्या; नांदेड हादरलं


हिमायतनगर : लग्नसमारंभातील आनंद काही क्षणांतच रक्तरंजित दु:खात बदलला. चुलत भावाच्या लग्नात पत्नीने डीजेवर नाचल्याचा राग पतीच्या मनात इतका पेटला की त्याने थेट मध्यरात्री सासरवाडीत जाऊन पत्नीची हत्या केली. धक्कादायक बाब म्हणजे पत्नीचा जीव घेतल्यानंतर काही तासांतच पतीनेही आत्महत्या केली. या घटनेमुळे नांदेड जिल्ह्यात खळबळ उडाली असून तीन लहान मुले एका रात्रीत आई-वडिलांविना पोरकी झाली आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, भोकर तालुक्यातील फुलवाडी तांडा येथील विनोद रंगराव राठोड (वय 40) आणि त्यांची पत्नी पायल राठोड (वय 27) हे नातेवाईकांच्या लग्नासाठी बोरगडी तांडा येथे आले होते. 10 मे रोजी झालेल्या लग्नात पायल यांनी डीजेवर नृत्य केले होते. हा प्रकार विनोद यांना आवडला नाही. यावरून दोघांमध्ये जोरदार वाद झाला. संतापलेल्या पायल या आपल्या मुलांसह माहेरी निघून गेल्या होत्या.

मात्र, विनोद यांच्या मनातील राग शांत झाला नव्हता. मंगळवारी पहाटे सुमारे 3 वाजण्याच्या सुमारास त्यांनी सासरवाडीत जाऊन झोपेत असलेल्या पायल यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला. गंभीर जखमी झालेल्या पायल यांचा जागीच मृत्यू झाला.

पत्नीची हत्या केल्यानंतर विनोद यांनी गावाबाहेरील शिवारात जाऊन झाडाला गळफास घेत आत्महत्या केली. सकाळी पायल यांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळल्यानंतर गावात एकच खळबळ उडाली. त्यानंतर शोध घेतला असता विनोद यांचाही मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत सापडला.

या दुहेरी घटनेमुळे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला असून दोन मुली आणि आठ महिन्यांचे बाळ पोरके झाले आहे. परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

या प्रकरणी हिमायतनगर पोलीस ठाणे यांनी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!