Crime News : सुट्टी मागायला गेला, मॅनेजरच्या नकाराने संतापला, तुला संपवतो म्हणत डोक्यात थेट घातली खुर्ची, इंदापूरमध्ये धक्कादायक प्रकार…

Crime News : सुट्टीच्या अर्जावरून पुण्यात एसटी आगारातील पाळी प्रमुखाने आगार व्यवस्थापकाला मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. इंदापूर एसटी आगारात हा प्रकार घडला आहे. पाळी प्रमुखाने आगार व्यवस्थापकाच्या अंगावर धावून जात तुला संपवतो अशा शब्दात धमकी दिली.
तसंच खुर्चीने मारहाण करत जखमी केले आहे. मॅनेजरच्या डोक्यात, डाव्या खांद्यावर आणि हातावर खुर्ची मारली. या मारहाणीत आगार व्यवस्थापक किरकोळ जखमी झाले आहे.
सविस्तर माहिती अशी की,गोकुळ रामचंद्र जाधव हे इंदापूर एसटी आगारात पाळी प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी आगार व्यवस्थापकांशी रजेच्या अर्जावरून वाद घातला आणि मारहाण केली. आगार व्यवस्थापक हनुमंत गोसावी हे ऑफिसमध्ये इतर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसोबत दैनंदिन आढावा बैठक घेत होते. Crime News
या बैठकीला बसस्थानक प्रमुख संजय वायदंडे, वाहतूक नियंत्रक निवृत्ती घनवट, लिपिक तौसीफ शहाबुद्दीन शेख हे उपस्थित होते. या बैठकीवेळी गोकुळ कार्यालयात आला आणि माझा रजेचा अर्ज लगेच मंजुर करा असं हनुमंत गोसावी यांना सांगितलं.
हनुमंत गोसावी यांनी गोकुळ जाधव यांना आता बैठक सुरू आहे, बैठक झाली की या असं सांगितलं. तेव्हा संतापलेल्या गोकुळ जाधव याने हनुमंत गोसावी यांना शिवीगाळ केली. तू माझे वाटोळे केले, मी तुला बघून घेतो, तुला संपवतो अशा शब्दात धमकी दिली.
दरम्यान, त्यानंतर हनुमंत गोसावी यांना खुर्चीने मारहाण केली. तिथे असलेल्या इतरांनी जाधव यांना रोखत हनुमंत गोसावी यांना बाजूला नेले. गोसावी यांनी रुग्णालयात जाऊन उपचार घेतल्यानंतर पोलीस ठाण्यात या प्रकरणी तक्रार दाखल केली आहे.