लोणी स्टेशनमध्ये गोरक्षकांनी गोमांस पकडले, ८० हजार रुपयांच्या मुद्देमालासह तीन जणांना अटक..

लोणी काळभोर : लोणी स्टेशन परिसरात गोमांस सदृश्य जनावरे कापून त्याचे मांस बेकायदेशीरपणे विक्री केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार गोराक्षकांनी शुक्रवारी (ता.8) पहाटे साडेबारा वाजण्याच्या सुमारास उघडकीस आणला आहे. याप्रकरणी लोणी काळभोर पोलिसांनी तीन जणांना अटक करून 80 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

अविनाश राजेंद्र सोनकांबळे (वय 38, भोसले वस्ती, लोणी काळभोर, ता हवेली जि पुणे), शरीफ युसुफ कुरेशी (वय 42 राजधानी बेकरीचे पाठिमागे लोणी स्टेशन, कदमवाकवस्ती, पुणे) व शेरु पठाण (रा पठारे वस्ती कदमवाकवस्ती, लोणी स्टेशन) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तर याप्रकरणी प्रकाश बाळकृष्ण खोले (वय 29, कदमवाकवस्ती, लोणी काळभोर ता. हवेली जि पुणे) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रकाश खोले हे गोरक्षक असून त्यांची लोणी काळभोर परिसरात एक मोबाईल शॉपी आहे. गोरक्षक प्रकाश खोले व त्यांच्या सहकाऱ्यांना लोणी स्टेशन परिसरात जनावरांची कत्तल करून विक्री केली जात आहे. असे समजले होते. त्यामुळे गोरक्षक लोणी स्टेशन परिसरात पाळत ठेवून होते. गुरुवारी (ता.7) रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास अविनाश सोनकांबळे हा त्याच्या ताब्यातील मारुती सुझुकी सुपर कैरी गाडीतील गोमांस सदृश्य मांस शेरु पठाण यांना हॉटेलमध्ये बिर्याणी बनविण्यासाठी देत असताना आढळून आला.

दरम्यान, शरीफ कुरेशी याने त्याच्या मालकीच्या राजधानी बेकरीच्या पाठिमागे राहत असलेल्या घरामध्ये गोमांस सदृश्य जनावरांची कत्तल केली आहे. तसेच त्याच्याजवळ मांस विक्री करण्याचा कोणताही कायदेशीर परवाना नसतानाही तो मांस बाळगताना मिळून आला. याप्रकरणी प्रकाश खोले यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार वरील तिन्ही आरोपींच्या विरोधात भारतीय न्याय सहिता 2023 चे कलम 325 तसेच महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम 1978 चे कलम 59 (अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होताच, पोलिसांनी वरील तिन्ही आरोपींना त्वरित अटक केली आहे. तर या कारवाईत 50 हजार रुपये किंमतीचा चार चाकी टेम्पो व 30 हजार रुपये किंमतीचे 100 ते 150 किलो मांस असा सुमारे 80 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पुढील तपास लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सर्जेराव बोबडे करीत आहेत.