भवरापूरला जमिनीच्या वादातून चुलत भावावर भरधाव गाडी घालून चिरडले; दोघांना उरुळीकांचन पोलिसांकडून अटक..

उरुळी कांचन : भवरापूर (ता.हवेली) येथील जमीनीच्या वादातून झालेल्या मारामारीचे पोलिस ठाण्यात तक्रार देऊन वैद्यकीय तपासाणीसाठी घरी दुचाकीवरून जाणाऱ्या चुलत भावाला कारने पाठिमागे जोरदार धडक देऊन जागीच ठार केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी उरुळीकांचन पोलिसांनी दोघांवर खूनाचा गुन्हा दाखल करुन अटक केल्याची घटना घडली आहे.

महेश लक्ष्मण साठे (वय 34 रा.भवरापूर , ता.हवेली जि.पुणे ) असे अपघात घडवून ठार केलेल्या तरुणाचे नाव आहे. त्यांचा चुलत भाऊ अक्षय दशरथ साठे (वय 32) व गोकुळ कोकरे (वय-27 दोघेही रा. भवरापूर , ता.हवेली ,जि.पुणे )असे अपघात घडवून खून करणाऱ्यांची नावे आहेत. या प्रकरणी उरुळीकांचन पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्याची कार्यवाही सुरू आहे.
मयत महेश साठे व अक्षय साठे या चुलत भावांची जमीनीच्या कारणावरून कुटूंबासहीत दुपारी वाद घडला होता. या वादातून महेश व अक्षय यांच्यात मारामारी होऊन महेश हे उरुळीकांचन पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी आले होते.

तक्रारीनंतर वैद्यकीय तपासासाठी ते उरुळीकांचन येथील प्राथमिक केंद्रातून कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी ते उरुळीकांचन -भवरापूर रस्त्याने घरी चालले असताना अक्षय साठे याने आपला चुलत भाऊ महेश साठे यांचा खून करण्याचा उद्देशाने आयटेव्टी कारने महेशचा दुचाकीला जबर धडक देत महेशला रस्त्यावर गंभीर मार बसून रस्त्याच्या थारोळ्यात पडला.
त्यानंतर प्रत्यदर्शनींनी माहिती दिल्यानंतर पोलिसांनी तात्काळ अक्षय साठे व गोकुळ कोकरे यांना ताब्यात घेऊन अटक केली आहे. दरम्यान अशा प्रकारे चुलत भावाला संपविण्याचा प्रक्रियेने भवरापूर गावात तणाव पसरला आहे.