उरुळी कांचन येथील सिडलिंग्ज कंपनीविरोधात कृषी विभागाकडे तक्रार ! बोगस रोप दिल्याचा शेतकऱ्यांचा आरोप ; कृषी विभागाच्या कारवाईकडे शेतकऱ्यांचे लक्ष ……

लोणी काळभोर : एका कंपनीने झेंडूची बोगस रोपे देऊन हवेलीसह दौंड आणि पुरंदर तालुक्यातील ५० पेक्षा जास्त शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या कंपनीने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यास नकार दिला आहे. न्याय मिळावा म्हणून संबंधित शेतकऱ्याने याबाबत हवेली तालुका कृषी विभागाकडे तक्रार केली होती. कृषी विभागाने पंचनामे करून देखील अद्यापही शेतकऱ्यांना कुठलीही मदत न मिळाल्याने बळीराजा आर्थिक संकटात सापडला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार विजय गणपत जवळकर (वय ५१, रा.आळंदी म्हातोबाची, तालुका हवेली जिल्हा पुणे) व इतर शेतकऱ्यांनी उरुळी कांचन येथील ग्रीन फिंगर्स सीडलिंग टेक्नॉलॉजी या वितरकाकडून पिंपळवंडी (ता. जुन्नर) येथील विकास हायटेक नर्सरी या कंपनीची झेंडूची रोपे विकत घेतली होती. वितरकाने या कंपनीचे झेंडूचे ऑरेंज प्राईम हे वाण हवेली, दौंड व पुरंदर तालुक्यातील ५८ शेतकऱ्यांना विक्री केले.शेतकऱ्यांनी शेतीची मशागत करून शेणखत, ठिबक सिंचन करून या रोपाची अधुनिक पद्धतीने लागवड केली. यासाठी शेतकऱ्यांनी लाखो रुपयांचा खर्च केला. अतिशय चांगल्या प्रकारे काळजी घेतल्यामुळे व खत, औषधे वेळेवर दिल्यामुळे झेंडूचे पिक हे चांगले येणे अपेक्षित होते. परंतु रोपांची व्यवस्थित वाढ झाली नाही. तसेच रोपाला झेंडूचे फुले तुरळक लागली. त्यामुळे शेतकऱ्याला या रोपांवर संशय आला.त्यानंतर शेतकऱ्यांनी याबाबत उरुळी कांचन येथील वितरकाकडे तक्रार केली. त्याने कंपनीच्या अधिकाऱ्यांची आणि शेतकऱ्यांचा घडवून आणला. कंपनीचे एक पथक शेतकऱ्यांच्या शेतात आले. पिकांची पाहणी केल्यानंतर शेतकऱ्यांनी कंपनीच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून याबाबत विचारणा केली असता, त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली.
शेतकरी विजय जवळकर यांनी कृषी विभागाकडे तक्रार केली. कृषी विभागाने शेतकऱ्यांच्या शेतातील पिकाची पाहणी केली. तपासणी दरम्यान २८.६६% झाडांची वाढ कमी असल्याचे निदर्शनासं आले आहे. कंपनीच्या पिकाचा गुणधर्म उल्लेख केल्याप्रमाणे नसून विक्रीस योग्य नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे सर्वसाधारणपणे २९ टक्के नुकसान झाले आहे. असा अहवाल कृषी विभागाने दिला आहे. परंतु अद्यापही शेतकऱ्यांना कुठलीही मदत मिळाली नाही. अथवा संबंधित कंपनीवर प्रशासनाकडून कोणतीही कारवाई न झाल्याची माहिती मिळत आहे.

कृषी विभागाच्या वतीने शेतकऱ्याच्या पिकाची पाहणी करण्यात आली आहे. शेतकऱ्याच्या पिकाचे २९ टक्के नुकसान झाले आहे. असे विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी सांगितले आहे. परंतु, शासकीय निकषानुसार ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत दिली जाते, अशी प्रतिक्रिया गणेश धस (कृषी अधिकारी, हवेली तालुका) यांनी व्यक्त केली.

पिंपळगाव येथील विकास हायटेक नर्सरी येथून तयार रोपे आणली होती. या रोपांची विक्री हवेली, दौंड व पुरंदर तालुक्यातील शेतकऱ्यांना केली आहे. विक्री योग्य फुले शेतकऱ्यांना निघाली नसल्याने त्यांची फसवणूक झाली आहे. कंपनीचे प्रतिनिधी पाटील यांनी सर्व शेतकऱ्यांच्या शेतीची पाहणी केली आहे. त्यानंतरही त्यांनी कोणताही प्रतिसाद न दिल्याने सर्व शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत.असे हरिविजय कांचन (विक्रेता – उरुळी कांचन, ता. हवेली)यांनी म्हटले आहे.