चाकण MIDC मधील 20 कंपन्या खरंच जाणार? शरद पवारांच्या प्रश्नावर फडणवीसांचं सडेतोड उत्तर

पुणे : पुण्यातील वाहतूक कोंडीचा फटका चाकण MIDC परिसरातील उद्योगांना बसत असल्याची चर्चा सुरू झाली आहे. वाहतूक कोंडीमुळे परिसरातील सुमारे 20 कंपन्या स्थलांतर करण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जात असून, या कंपन्यांमध्ये जवळपास 2 हजार कामगार कार्यरत आहेत. त्यामुळे त्यांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी सरकारने या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी केली. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून सविस्तर भूमिका मांडली आहे.

संसदेत खासदार राजाभाऊ वाजे यांनी विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात केंद्र सरकारने महाराष्ट्रातील 36,211 कंपन्या बंद झाल्याची माहिती दिली होती. या आकडेवारीचा काही नेत्यांकडून सोयीने अर्थ लावला जात असून, त्यावर माध्यमांमध्येही बातम्या प्रसिद्ध झाल्याचा दावा फडणवीस यांनी केला.


महाराष्ट्रहिताचा कायम विचार करणारे ज्येष्ठ नेते म्हणून शरद पवार यांच्या मनात या विषयाबाबत गैरसमज राहू नये, यासाठी आपण वस्तुस्थिती स्पष्ट करत असल्याचे फडणवीस यांनी म्हटले आहे.
76 टक्के कंपन्या ‘डिफंक्ट’ श्रेणीतील
फडणवीस यांच्या म्हणण्यानुसार, बंद झालेल्या कंपन्यांपैकी 76 टक्के कंपन्या ‘डिफंक्ट’ श्रेणीतील आहेत. म्हणजेच या कंपन्या प्रत्यक्षात कार्यरतच झाल्या नव्हत्या. केंद्र सरकारकडून संसदेत किंवा माहितीच्या अधिकारातून दिल्या जाणाऱ्या माहितीचे एक निश्चित स्वरूप असते. त्यामुळे सभागृहात त्यावर सविस्तर चर्चा झाल्यास अधिक तपशील समोर येऊ शकतो, असे त्यांनी स्पष्ट केले.
कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाच्या संकेतस्थळावर कंपन्यांची संपूर्ण आकडेवारी उपलब्ध असल्याचेही फडणवीस यांनी सांगितले. महाराष्ट्र उद्योगांच्या बाबतीत देशात पहिल्या क्रमांकावर होता आणि पुढेही राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
देशातील सक्रिय कंपन्यांची संख्या तिपटीपेक्षा अधिक वाढली
देशात सध्या 31 लाखांहून अधिक कंपन्या नोंदणीकृत असून, त्यापैकी जवळपास 21 लाख कंपन्या सक्रिय आहेत. 2015-16 मध्ये देशातील सक्रिय कंपन्यांची संख्या 6,78,768 होती. ही संख्या आता 21,17,747 वर पोहोचली आहे. म्हणजेच मागील दहा वर्षांत सक्रिय कंपन्यांची संख्या तिपटीपेक्षा अधिक वाढल्याचे फडणवीस यांनी सांगितले.
महाराष्ट्रात सर्वाधिक कंपन्या
3 जून 2026 च्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रात 3,96,211 कंपन्या आहेत. त्यानंतर दिल्लीमध्ये 2,72,342 आणि उत्तर प्रदेशमध्ये 1,85,982 कंपन्या आहेत.
कोविडचा कालावधी वगळता देशात दरवर्षी साधारण 20 ते 22 हजार कंपन्या बंद होतात. यापैकी 76 टक्के डिफंक्ट कंपन्या, 12 टक्के अमालगमेशन अर्थात कंपन्यांचे एकत्रीकरण आणि 2 टक्के विसर्जित कंपन्यांचा समावेश असल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केले.
2019-20 मध्ये 6 लाख कंपन्या रद्द
2019-20 मध्ये कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाने विशेष मोहीम राबवून तब्बल 6 लाख कंपन्या रद्द केल्या होत्या. त्यामुळे प्रत्यक्ष व्यवसाय बंद होण्यापेक्षा निष्क्रिय कंपन्यांना ‘स्ट्राइक ऑफ’ करण्याची संख्या अधिक असल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केले.