मुंबई लोकलमध्ये खळबळ! श्वास घेण्यास त्रास झाल्याने महिला प्रवासी बेशुद्ध; धक्कादायक प्रकार उघड

मुंबई : मुंबईची जीवनवाहिनी समजल्या जाणाऱ्या लोकल रेल्वेमध्ये प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. मध्य रेल्वेवरील मुलुंड स्थानक परिसरात एसी लोकलमधील वातानुकूलन यंत्रणा बंद पडल्याने काही महिला प्रवाशांना श्वास घेण्यास त्रास झाल्याची घटना समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुलुंड रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक २ वर आलेल्या एसी लोकलमधील एसी यंत्रणा सुमारे १५ मिनिटे बंद होती. लोकलचे दरवाजे स्वयंचलित आणि बंद असल्याने डब्यातील हवा खेळती राहिली नाही. त्यामुळे उकाडा आणि गुदमरलेल्या वातावरणामुळे काही महिला प्रवाशांना त्रास झाला.
अचानक श्वास घेण्यास अडचण निर्माण झाल्याने काही महिला प्रवासी चक्कर येऊन बेशुद्ध पडल्या. या प्रकारामुळे लोकल डब्यात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.

घटना लक्षात येताच सहप्रवाशांनी तातडीने मदत केली. प्रसंगावधान राखत बेशुद्ध झालेल्या महिला प्रवाशांना मदत मिळाल्याने मोठा अनर्थ टळला.

दरम्यान, मुंबई लोकलमध्ये दिवसेंदिवस वाढणारी गर्दी आणि तांत्रिक बिघाडामुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. एसी लोकलसारख्या सुविधांमध्ये अशा प्रकारचे बिघाड होऊ नयेत, अशी मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.