पुणे पोलिसांच्या इतिहासात पहिल्यांदाच मोठी कारवाई! आयुक्त रितेश कुमार ॲक्शन मोडवर, दोन दिवसांत दोन पोलीस निरीक्षकांसह दहाजण निलंबित

पुणे : पुण्यात सध्या गुन्हेगारी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. अनेक ठिकाणी दहशत निर्माण केली जात आहे. मुली सुरक्षित नाहीत. त्याच्यावर हल्ले होत आहेत. आता शहरातील सहकारनगरमध्ये झालेल्या वाहनांच्या तोडफोड प्रकरणाची पुणे पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी गंभीर दखल घेतली आहे.
वाहनांच्या तोडफोड प्रकरणाच्या गुन्ह्यांची तक्रार गांभीर्याने न घेतल्याने दोन पोलीस निरीक्षकांसह तब्बल सात जणांना गुरवारी निलंबित करण्यात आलं आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
पुणे पोलिसांच्या इतिहासात पहिल्यांदाच एवढी मोठी कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये दोन पोलीस निरीक्षक, पोलीस कर्मचाऱ्यांनी कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत कारवाई करण्यात आली.
यामध्ये सावळाराम साळगावकर, मनोज एकनाथ शेंडगे, सहायक निरीक्षक समीर विठ्ठल शेंडे, पोलीस उपनिरीक्षक हसन मकबूल मुलाणी, पोलीस उपनिरीक्षक मारुती गोविंद वाघमारे, पोलीस हवालदार विनायक दत्तात्रेय जांभळे यांना निलंबित करण्यात आले आहे.
आपल्या कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी गेल्या दोन दिवसांत दहाजणांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. सदाशिव पेठेतील पेरूगेट पोलीस चौकीचे तीन पोलीस कर्मचारी निलंबित केल्यानंतर पोलीस आयुक्तांनी आज आणखी सात जणांवर निलंबनाची कारवाई केली.