उधळीत ये रे गुलाल पावसा… ‘या’ तारखेला देशात मान्सूनची एंट्री; 10 राज्यांना अलर्ट


मुंबई : देशभरात मान्सूनच्या आगमनाची उत्सुकता वाढली असतानाच हवामान विभागाने मोठा अंदाज वर्तवला आहे. नैऋत्य मान्सून आता वेगाने पुढे सरकत असून, येत्या 26 मे रोजी केरळमध्ये मान्सून दाखल होण्याची दाट शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्यानंतर पुढील दोन ते तीन दिवसांत मान्सून अधिक सक्रिय होण्याचा अंदाज आहे.

दरम्यान, भारतीय हवामान विभागने देशातील किमान दहा राज्यांसाठी मुसळधार पाऊस, वादळी वारे, धुळीचे वादळ आणि विजांच्या कडकडाटाचा इशारा दिला आहे. काही भागांमध्ये वीज पडण्याची शक्यताही हवामान खात्याने वर्तवली आहे.

हवामान विभागाच्या माहितीनुसार, 19 ते 22 मे दरम्यान जम्मू-काश्मीरमध्ये तर 20 ते 22 मे दरम्यान उत्तराखंडमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो. या भागात ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. तसेच अंदमान-निकोबार बेटांवर 19 ते 24 मे दरम्यान पावसाचा जोर वाढणार आहे.

पुढील काही दिवसांत महाराष्ट्रासह ओडिशा ते पश्चिम बंगालपर्यंत पावसाचा प्रभाव वाढण्याची शक्यता आहे. मध्य भारतात मान्सून अधिक सक्रिय होणार असल्याने उकाड्याने त्रस्त नागरिकांना मोठा दिलासा मिळू शकतो.

सध्या अंदमान-निकोबार बेटांभोवती मान्सून सक्रिय झाला असून, त्याचा परिणाम कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातही दिसून येण्याची शक्यता आहे. अरब सागर आणि बंगालच्या उपसागरात मान्सूनसाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. महाराष्ट्र, मराठवाडा आणि कर्नाटक परिसरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने राज्यातील अनेक भागांत तुरळक पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

विशेषतः सिंधुदुर्ग, कोल्हापूर, रत्नागिरी, सातारा तसेच घाटमाथ्यावर पावसाची हजेरी लागू शकते. पश्चिम विदर्भातील यवतमाळ आणि वर्धा जिल्ह्यांमध्येही काही ठिकाणी हलका पाऊस पडण्याचा अंदाज आहे. त्यामुळे तापमानात काही प्रमाणात घट होणार असली तरी रात्रीचा उकाडा वाढण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

दरम्यान, राज्यातील काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून विदर्भातील अनेक भाग सध्या तीव्र उष्णतेने होरपळत आहेत. मात्र पुढील आठवड्यात राज्यातील अनेक भागांत आल्हाददायक वातावरण तयार होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!