थंडीचा कहर! राज्यात पुन्हा थंडीचा कडाका वाढणार, हवामानाचा अंदाज काय?

पुणे : नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच महाराष्ट्रातील हवामानात सातत्याने बदल जाणवत असून उत्तरेकडील वाऱ्यांमुळे थंडीचा कडाका वाढला आहे.किमान तापमानात मोठी घट झाली असल्यामुळे पुढील काही दिवसांत गारठा कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार,महाराष्ट्राच्या किमान तापमानात घट झाल्याने मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात थंडीचा कडाका अधिक असणार आहे. तुरळक ठिकाणी थंडीच्या लाटेचीं स्थिती आहे. आज राज्याच्या किमान तापमानातील चढ-उतार होत, गारठा कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे थंडीचा कडाका आणखीनच वाढणार आहे.
दरम्यान पुणे, जळगाव, मालेगाव, नाशिक, भंडारा, गोंदिया, नागपूर, यवतमाळ येथे १० अंश व त्यापेक्षा कमी तापमानाची नोंद झाली आहे.तर धुळे येथे ६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. परभणी येथे ६.४ अंश सेल्सिअस, निफाड येथे ६.८ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. अहिल्यानगर, जेऊर येथे ९ अंशांपेक्षा कमी तापमानाची नोंद झाली आहे.

दरम्यान पुढील काही दिवसांत थंडीचा कडाका झपाट्याने वाढणार आहे. त्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन हवामान खात्याकडून करण्यात आले आहे.