प्रचाराच्या अंतिम टप्प्यात डोंबिवलीत राडा ; भाजप उमेदवाराच्या पतीवर धारदार हत्यारांने वार, शिवसेनेच्या दोन उमेदवारांवर गुन्हा

मुंबई: महापालिका निवडणुकीसाठीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला असताना डोंबिवलीत भाजप आणि शिंदे गटात जोरदार राडा झाला आहे.भाजपच्या उमेदवार आर्या नाटेकर यांचे पती ओमनाथ नाटेकर यांच्या डोक्यात लोखंडी धारदार हत्याराने वार करण्यात आले आहे. त्यामुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीमध्ये शिवसेना शिंदे गट आणि भाजपा यांची युती असली तरी डोंबिवली पूर्वेतील पॅनल 29 मध्ये मात्र दोन्ही पक्ष आमने-सामने उभे आहेत.याठिकाणी भाजपच्या उमेदवार आर्या नाटेकर यांचे पती ओमनाथ यांच्यावर हत्याराने वार करण्यात आले आहेत. शिवसेना शिंदे गटाच्या जमावाने हा हल्ला केला असल्याची माहिती समोर आली आहे.
यामध्ये आणखीन दोन ते तीन जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे.
भाजपच्या उमेदवार आर्या नाटेकर यांचे पती ओमनाथ यांनी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, तुकारामनगर मध्ये ओमनाथ हे चिन्मय वारंगे, हेमंत म्हात्रे, सचिन कार्लेकर, अनुप शेलार, प्रदीप सागवेकर यांच्या सोबत पत्नी आर्या हिच्या प्रचारासाठी गेले होते. तेथून ते घरी जात असताना शिंदे गटाचे उमेदवार नितीन पाटील रवी पाटील त्यांची मुले रोशन आणि यश पाटील तसेच अनंत ठाकूर, रवी पुनसकर, प्रसाद घाग यांसह 50 ते 60 जणांचा जमाव आला.त्यांनी ओमनाथ यांना शिवीगाळ करत त्यांच्यावर धारदार हत्याराने वार केले.

यावेळी रवी पाटील यांनी लोखंडी तळविणे त्यांच्या चेहऱ्यावर वार केले. यात हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. ओमनाथ यांच्या सहकाऱ्यांना देखील लाकडी बांबूने व लाथाबुक्क्यानी मारहाण करण्यात आली आहे.या प्रकरणी रात्री उशिरा रामनगर पोलीस ठाण्यामध्ये आठ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.. उमेदवारांचा प्रचार अंतिम टप्प्यात असतानाच या घटना घडत असल्यामुळे डोंबिवली मधील राजकीय वातावरण तापले आहे.