मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मतदानापूर्वी सर्वात मोठा दावा, म्हणाले…

eknath shinde : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी कल्याण लोकसभा मतदारसंघातून आपला मुलगा आणि विद्यमान खासदार श्रीकांत शिंदे यांच्या विजयाचा विश्वास व्यक्त केला. आपल्या मुलाने तिसऱ्यांदा खासदार म्हणून उमेदवारी दाखल केली तेव्हा आपण कल्याणला भेट दिली होती आणि आता निकालाची चिंता नसल्यामुळे आपण दुसऱ्यांदा परिसराचा दौरा करत असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी मुख्यमंत्री म्हणाले, श्रीकांत विक्रमी मताधिक्याने विजयी होईल याची मला खात्री आहे. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी रोड शोमध्ये भाग घेतला. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे हे कल्याणमधून विद्यमान खासदार आहेत. आता देखील तेच उमेदवार आहेत.
मुंबईत जन्मलेले श्रीकांत शिंदे एमबीबीएसनंतर एमएस पदवी असलेले एक पात्र डॉक्टर आहेत. 2014 च्या निवडणुकीत वयाच्या 27 व्या वर्षी ते पहिल्यांदा खासदार म्हणून निवडून आले आणि ते सर्वात तरुण मराठा खासदारांपैकी एक बनले.
2019 च्या निवडणुकीत ते दुसऱ्यांदा निवडून आले. श्रीकांत शिंदे हे त्यांच्या राजकीय कारकिर्दीव्यतिरिक्त आरोग्य क्षेत्रातील कामासाठी ओळखले जातात आणि त्यांची आरोग्य व कुटुंब कल्याण स्थायी समितीचे सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.