धनंजय मुंडेच होणार बीडचे पालकमंत्री? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं मोठं वक्तव्य, चर्चेला उधाण…

मुंबई : राज्यात शपथविधी, खातेवाटप झाल्यानंतर आता संपूर्ण राजकीय वर्तुळाचं लक्ष पालकमंत्री पदे कधी जाहीर होणार याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे. महायुतीमध्ये अनेक जागांवर पालकमंत्रिपदावरून रस्सीखेच असल्याचं दिसून येत आहे.
काही दिवसांपूर्वी बीड जिल्ह्यातल्या केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली होती. यावरून सध्या वातावरण चांगलंच तापलं आहे. यातील काही आरोपींना अजूनही अटक करण्यात आलेली नाहीये. आरोपींना लवकरात लवकर अटक केली जाईल असं अश्वासन प्रशासनाकडून देण्यात आले आहे. दरम्यान त्यानंतर आता बीडचे नवे पालकमंत्री कोण असणार याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
गेल्यावेळी धनंजय मुंडे हे बीडचे पालकमंत्री होते. यावेळीही त्यांनाच पालकमंत्रिपद मिळणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारलं असता, बीडचं पालकमंत्री पद कोणाला द्यायचं यासंदर्भात मी अजितदादा आणि एकनाथ शिंदे मिळून ठरवू असं फडणवीस यांनी म्हटलं आहे. तसेच बीडमध्ये कोणाचीही दादगिरी आम्ही चालू देणार नाही असा इशाराही यावेळी फडणवीस यांनी दिला आहे.
अमोल मिटकरी यांच्या ट्विटमुळे चर्चेला उधाण..
दरम्यान दुसरीकडे काल पालकमंत्रिपदावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी यांनी देखील एक ट्विट केले होते. या ट्विटमुळे चर्चेला उधाण आलं आहे. अजितदादा तुम्ही पुण्याचं पालकमंत्री घेतले तेव्हा आपण पुण्यातील कोयता गँगची दहशत संपवली, आता तुम्ही बीड आणि परभणीचं देखील पालकमंत्रिपद स्विकारा अशा अशायचं एक ट्विट मिटकरी यांनी केलं होतं. या ट्विटनंतर चर्चेला उधाण आले आहे.