छत्रपतीची सर्वपक्षीय युती फिस्कटली? पृथ्वीराज जाचक यांनी बोलावली वेगळी बैठक, अजित पवारांसोबत जागांचा तिढा सुटत नसल्याने घेणार मोठा निर्णय?

भवानीनगर : छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी पॅनल १ मे रोजी जाहीर करणार असल्याचे लासुर्णे येथे सभा घेऊन सर्व कार्यकर्ते व सभासदांच्या उपस्थितीत साखर संघाचे अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांनी जाहीर केले. यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार व साखर संघाचे अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांची युती तुटली आहे का? याची चर्चा सुरू झाली आहे.
याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री दत्तात्रय भरणे व पृथ्वीराज जाचक यांच्यामध्ये कारखान्याच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी उमेदवारांच्या जागा संदर्भात चर्चा झाली. या चर्चेमध्ये ज्या जागा पृथ्वीराज जाचक यांना देण्यात आल्या, त्या जाचक यांना मान्य नसल्याने व ज्या जागा पृथ्वीराज जाचक यांनी उमेदवारासाठी सुचवल्या त्या न देता दुसऱ्याच व्यक्तीचे नाव सांगून त्यांना घेण्यात यावे अशी भूमिका मांडली.
यामुळे जाचक नाराज झाल्याचे सांगितले जात आहे. अजित पवार यांनी सगळी सूत्रे हाती देणार असल्याचे जाहीर करून देखील याबाबत हस्तक्षेप केला गेला, यामुळे जाचक नाराज झाले आहेत. यामुळे जाचक यांना श्री छत्रपती संचालक मंडळाच्या निवडणुकीमध्ये ज्या उमेदवारांना जागा देण्याचा निर्णय घेण्यात आला, तो फॉर्म्युला जाचक यांना मान्य झाला नाही.
यामुळे पृथ्वीराज जाचक यांनी १ मे रोजी पॅनल जाहीर करणार असल्याचे जाहीर केले. जाचक म्हणाले, छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या भल्यासाठी मी काहीही करायला तयार आहे. परंतु माझी मान मी दुसर्याच्या हातात देणार नाही. असे सांगितले यामुळे अजित पवारांनी पुन्हा एकदा फसवणूक केल्याची भावना अनेकांनी बोलून दाखवली.
बैठकीत उपस्थित असलेल्या सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी व शेतकरी सभासदांनी श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी जो काही निर्णय पृथ्वीराज जाचक घेतील तो आम्हाला मान्य असून त्यांच्या पाठीमागे आम्ही सर्वपक्षीय कार्यकर्ते एकमताने उभे राहू, असे म्हणत जाचक यांना पाठिंबा दर्शवला.
आता येत्या दोन दिवसात नेमकं काय घडणार याकडे सर्व सभासदांचे लक्ष लागले आहे. काही दिवसांपूर्वी अजित पवार यांनीच आपल्या संचालक मंडळाने कसा चुकीचा कारभार केला हेच जाहीर सभेत सांगितले होते. त्यांना परत तिकीट देणार नसल्याचे देखील अजित पवार म्हणाले होते.