पुण्यातील हॉटेल्सपासून लॉजपर्यंत चेतन चौधरीची ‘कुंडली’ उघड! सियासोबत मुक्काम, तरुणीवर दबावाचा आरोप; हत्येनंतर मित्रालाही सांगितली अपघाताची खोटी कहाणी

पुणे : केतन अग्रवाल हत्याकांडाच्या तपासात आरोपी चेतन चौधरीच्या कथित हालचालींबाबत नवनवीन माहिती समोर येत आहे. पोलिस तपासात चेतन आणि सियाच्या पुण्यातील विविध हॉटेलमधील मुक्कामाच्या नोंदी आढळल्या आहेत. हॉटेलमध्ये दाखल होताना दोघांनी दिलेली ओळखपत्रे, कर्मचाऱ्यांचे जबाब आणि हॉटेलमधील नोंदी पोलिसांनी तपासाचा भाग बनवल्या आहेत. याचदरम्यान लातूरहून पुण्यात शिक्षणासाठी आलेल्या एका तरुणीनेही चेतनच्या कथित वर्तनाबाबत पोलिसांसमोर महत्त्वाची माहिती दिल्याचे समोर आले आहे.
एनआयबीएमपासून गुलटेकडीपर्यंत मुक्कामाच्या नोंदी

नोव्हेंबर २०२५मध्ये एनआयबीएम रस्त्यावरील एका हॉटेलमध्ये चेतनने ऑनलाइन बुकिंग करून ३०४ क्रमांकाची खोली घेतल्याची माहिती तपासात पुढे आली आहे. हॉटेलमध्ये प्रवेश करताना चेतनने आधारकार्ड, तर सियाने लर्निंग ड्रायव्हिंग लायसन्स ओळखपत्र म्हणून दिल्याचे हॉटेलच्या असिस्टंट मॅनेजरने पोलिसांना सांगितले. दुसऱ्या दिवशी दुपारी एकच्या सुमारास दोघे हॉटेलमधून बाहेर पडले. जानेवारी २०२६मध्ये गुलटेकडी परिसरातील आणखी एका हॉटेलमध्येही दोघांनी मुक्काम केल्याची नोंद पोलिसांना मिळाल्याचे सांगितले जाते.


लातूरच्या तरुणीने पोलिसांना काय सांगितले?
९ मे २०२६च्या रात्री एस. बी. रस्त्यावरील एका क्लबमध्ये चेतनसह चौघे पार्टीसाठी गेले होते. त्यानंतर चौघे मार्केटयार्ड परिसरातील एका लॉजमध्ये थांबले. चेतनसोबत खोलीत राहिलेल्या लातूरच्या तरुणीने त्याने शारीरिक संबंधांसाठी तिच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप पोलिसांना दिलेल्या जबाबात केल्याचे समोर आले आहे. दुसऱ्या दिवशी तिने हा प्रकार मैत्रिणीला सांगितल्यानंतर, चेतनने यापूर्वीही दोन-तीन वेळा आपल्याशी अशाच प्रकारे जवळीक साधण्याचा प्रयत्न केल्याचा दावा तिच्या मैत्रिणीने पोलिसांसमोर केल्याचे तपासात नमूद आहे.
हत्येनंतर मित्राला फोन; अपघाताची बनावट कहाणी?
केतनच्या हत्येनंतर २२ जून रोजी चेतनने खासगी कंपनीत काम करणाऱ्या मित्राला फोन केल्याचे तपासात समोर आले आहे. लोणावळ्यात गाडीचा अपघात करून पळून आल्याचे त्याने मित्राला सांगितले. तसेच गाडी आणि मोबाईल क्रमांकावरून व्हॉट्सॲप व इन्स्टाग्रामवर धमक्या येत असल्याचा दावा केल्याचेही सांगितले जाते.
याच संभाषणात सोशल मीडियावरील चॅट्स डिलीट केल्यानंतर पोलिसांना त्या पुन्हा मिळवता येतात का, अशी विचारणा त्याने केली. क्राईम ब्रँच किंवा मोबाईल कंपनीत ओळखीची व्यक्ती आहे का, याची चौकशीही केल्याचे समोर आले आहे. मित्राने हटवलेला डेटा पोलिसांकडून पुन्हा मिळवता येऊ शकतो, असे सांगितले. त्याच रात्री दोघांची ठरलेली भेट झाली नाही. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी चेतन आणि सियाला पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे तपासातील माहितीतून समोर आले आहे.
