Chandrakant Patil : निलेश लंकेनंतर चंद्रकांत पाटील वादात, कुख्यात गुंड गजा मारणेकडून सत्कार स्वीकारला…

Chandrakant Patil : अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेसनंतर आता भारतीय जनता पक्षाचे पुण्यातील कुख्यात गुंड गजानन मारणे उर्फ गजा मारणे कनेक्शन समोर आला आहे. राष्ट्रवादी आणि गजानन मारणे प्रकरण शांत होत नाही तोच भाजप नेते अन् मंत्री चंद्रकांत पाटील यांचा सत्कार गजानन मारणे याने केला आहे.
पुण्यातील अट्टल गुंड असलेल्या गजा मारणे यांचा घरी जाऊन अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांनी भेट घेतली होती. तर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे खासदार नीलेश लंके यांनी देखील गुंड गजा मारणेची भेट घेत त्यांच्या हस्ते सत्कार स्वीकारला होता.
या दोन्ही नेत्यांवर मोठ्या प्रमाणात टीका झाली होती. असे असतांनाही भाजपचे जेष्ठ नेते व माजी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दहीहंडी उत्सवादरम्यान, गुंड गजा मारणे याच्याकडून सत्कार स्वीकारला. सध्या हा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत असून चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका केली जात आहे. Chandrakant Patil
पुण्यात सध्या विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहे. अनेक इच्छुक पुन्हा तयारीला लागले आहेत. त्यात चंद्रकांत पाटील यांची कोथरूड विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढवण्यासाठी तयारी आहे. या साठी येथील कार्यक्रमात ते भेटी गाठी वाढवण्यावर भर देत आहेत. मंगळवारी देखील कोथरूड मधील एका दहीहंडी कार्यक्रमात त्यांनी एका मंडळाला भेट दिली होती.
दरम्यान, या कार्यक्रमात गुंड गजा मारणे याने चंद्रकांत पाटील याची भेट घेत त्यांना पुष्पगुच्छ भेट देत स्वागत केलं. त्यांच्या हा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. यामुळे विरोधक चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका करण्याची शक्यता आहे. तर यावर चंद्रकांत पाटील काय प्रतिक्रिया देणार या कडे देखील सर्वांचे लक्ष लागून आहे.