भाडेकरूंची माहिती पोलीसांना सादर न करणाऱ्या घरमालकाविरोधात गुन्हा दाखल

लोणी काळभोर : तब्बल १७ भाडेकरूंची माहिती पोलीसांना सादर न करणाऱ्या घरमालकाविरोधात लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांनी दिलेल्या माहितीनुसार याप्रकरणी पोलीस हवालदार बापु शंकर वाघमोडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून विमल रामदास काळभोर (रा. कांचन गिरी मठाजवळ लोणी काळभोर हवेली पुणे) यांचेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस आयुक्त पुणे शहर यांनी भारतीय नागरीक सुरक्षा संहिता कायदा कलमान्वये घरमालक यांनी भाडेकरु ठेवताना तसेच खाजगी मालक यांनी नोकर भरती करताना सुरक्षीततेबाबत दक्षता घेणे करीता सदरची माहिती पोलीसांना कळविणे बंधनकारक असल्याबाबतचे आदेश काढलेले असुन त्याबाबत पोलीस विभागातर्फे वेळोवेळी प्रसार माध्यमाव्दारे त्याची प्रसिध्दी करण्यात आली आहे.
सध्या दिल्ली येथे झालेल्या बॉम्ब स्फोटाच्या अनुषंगाने लोणीकाळभोर पोलीस स्टेशन कार्यक्षेत्रात भाडेकरुं बाबत माहिती तसेच हद्दीमधील हॉटेल, लॉजेस मर्मस्थळे व गर्दीचे ठिकाणी भेटी देण्यासाठी वरिष्ठांचे आदेशाने पोलीस स्टेशन स्तरावर पथक निर्माण करण्यात आलेले आहे. त्यानुसार १९ नोव्हेंबर/ रोजी अफसर अहेसान अन्सारी याच्याकडे ब्राउन रंगाची मॅफेड्रॉन (एम.डी.) मिळुन आली होती. त्याचे वास्तव्य असलेल्या काळभोर हाईट्स, पाषाणकर बाग, लोणी काळभोर, हवेली, पुणे येथील राहत्या घरी अधिक चौकशी केली असता सदरचा आरोपी हा भाडेतत्त्वावर राहण्यास असुन त्यांचे घरमालक यांनी त्यांचे इमारतीमध्ये एकुण १७ भाडेकरू ठेवलेले होते. ठेवण्यात आलेल्या भाडेकरूंची माहिती पोलीसांना कळविणे बंधनकारक असताना ही सदरची माहिती कळविली नसल्याने त्यांचे विरुध्द लोणी काळभोर पोलीस स्टेशन येथे भारतीय न्याय संहिता कलम २२३ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला असुन पुढील तपास सुरु आहे.

काळभोर हाईट्स तेथे केलेल्या तपासणीत पोलिसांना,विमल काळभोर यांनी त्यांचे मालकीचे घरात भाडेकरू स्वप्निल बट्टेवार, चंद्रकांत मोडक, गणेश कांबळे, राहुल सावंत, फिरोज खान, राकेश जाधव, इम्रान मनियार, रवि खोकर, रोहित खरे, माहिर अन्सारी, समाधान तावले, लखन खोकर, नंदा लांडगे, मारूती इंगळे, विजय सोनकांबळे, फिरोज कबिर, महेश अंबुसे, यांना घर भाड्याने देवून त्या बाबत कुठल्याही प्रकारची माहिती लोणी काळभोर पोलीस स्टेशनला न कळवता पोलीस उपआयुक्त विशेष शाखा पुणे शहर यांनी जारी आदेशाची जाणून बुजून अवज्ञा करताना मिळून आलेला आहे.म्हणून घरमालक विमल रामदास काळभोर यांचे विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
त्यानुसार राजेंद्र पन्हाळे वरीष्ठ पोलीस निरीक्षक लोणी काळभोर पोलीस स्टेशन – लोणी काळभोर पोलीस ठाणेचे वतीने आवाहन करण्यात येते की, ज्या घरमालकानी भाडेकरु ठेवलेले आहेत. त्यांनी भाडेकरूंची माहिती तसेच खाजगी मालक यांनी नोकर भरती करताना सुरक्षीतते बाबत दक्षता घेणे करीता सदरची माहिती भारतीय नागरीक सुरक्षा संहिता कलम १६३ (३) प्रमाणे पोलीसांना देणे बंधनकारक असल्याने सदरची माहिती सादर करावी.
सदरची कामगिरी पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ ०५, डॉ. राजकुमार शिंदे, सहाय्यक पोलीस आयुक्त, हडपसर विभाग, अनुराधा उदमले यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे पोलीस हवालदार रवि आहेर, संदीप जोगदंड, बापु वाघमोडे यांचे पथकाने केली असुन त्यामध्ये अधिक तपास लोणी काळभोर पोलीस स्टेशनकडुन करण्यात येत आहे.