राजकीय वर्तुळात चर्चा! राज्यसभेच्या जागेसाठी भुजबळांचे लॉबिंग, पुतण्यासाठीही फिल्डिंग; ‘इतर नेत्यांची मुलं-मुली मंत्री होतात, मग…’

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात सध्या अनेक घडामोडी घडत आहेत. यामुळे याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. सुनेत्रा पवार यांनी राज्यात उपमुख्यमंत्री होण्यासाठी राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेवर आपली वर्णी लागावी, यासाठी छगन भुजबळ हे प्रयत्नशील आहेत.

यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. छगन भुजबळ यांनी राज्यसभेवर जाण्याची इच्छा अगदी जाहीरपणे बोलली नसली तरी पडद्यामागून त्यांचे या जागेसाठी लॉबिंग सुरु असल्याचे समजते. तसेच आपले पुतणे समीर भुजबळ यांनाही राज्य मंत्रिमंडळात स्थान मिळावे, यासाठी छगन भुजबळ हे आग्रही आहेत.
अजित पवार उपमुख्यमंत्री असताना सुनेत्रा पवार यांना खासदार करण्यात आले. सुनील तटकरे खासदार असताना मुलीला राज्यात कॅबिनेट मंत्री केले. आता पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा राज्यात उपमुख्यमंत्री, त्यांचा मुलगा पार्थ पवार दिल्लीत खासदार, मग इतरांच्याबाबत हे सूत्र लागू का केलं जात नाही?, असा सवाल भुजबळ समर्थक नेत्याने उपस्थित केला आहे.

मनोज जरांगे यांच्या मराठा आरक्षण आंदोलनाला छगन भुजबळ यांनी कडाडून विरोध केला होता. आंदोलनाविरोधात पहिल्यांदा ओबीसी नेता म्हणून ठामपणे उभे राहणारे छगन भुजबळ हेच होते. यामुळे पक्षात मोठा वाद निर्माण झाला होता. त्यांच्या या भूमिकेचा राष्ट्रवादी काँग्रेसला फटका बसत होता.

तेव्हा अजित पवार यांनी बैठकीत नाराजीही बोलून दाखवली होती. काही नेते विशिष्ट जातीवर टोकाची भूमिका घेतात, त्यांचं मत हे पक्षाची प्रतिमा चूकीची करते. पक्षाला किंमत मोजावी लागते, असे अजित पवार यांनी म्हटले होते. यामुळे नाराजी सुरू झाली होती.