रेल्वेच्या धडकेत लोणी काळभोर येथील वीटभट्टी कामगाराचा मृत्यू…

पुणे : रेल्वेने दिलेल्या धडकेत एका २० वर्षीय वीटभट्टी कामगाराचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना हवेली तालुक्यातील लोणी काळभोर ग्रामपंचायत हद्दीतील माळीमळा परिसरातुन समोर आली आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.

सुरज नानला भिलाला (वय-२०, रा. बोरकरवस्ती, लोणी काळभोर, ता. हवेली, मूळ रा. मध्यप्रदेश) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नानला भिलाला व त्यांचे कुटुंब बोरकर यांच्या वीटभट्टी काम काम करत होते. नानला भिलाला हे पत्नी व दोन मुलांसह बोरकर परिसरात राहत होते. लोणी काळभोर ग्रामपंचायत हद्दीतील माळीमळा परिसरात सुरजला रात्री बारा वाजण्याच्या सुमारास रेल्वेने धडक दिली. या अपघातात सुरज मृत्यू झाला आहे.

या घटनेची माहिती मिळताच लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार ईश्वर भगत, महेश करे, राहुल कर्डिले तातडीने घटनास्थळी दाखल झाले होते. तेव्हा सुरजचा जागीच मृत्यू झाला होता. पोलिसांनी त्याचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला.
दरम्यान, याप्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार केतन धेंडे करत आहेत.