मुंबई- पुणे एक्सप्रेस वेवर प्रवाशांनी भरलेल्या बसला भीषण आग; ३६ प्रवासी बालंबाल बचावले


 

तळेगाव दाभाडे, (पुणे) : मुंबई – पुणे द्रुतगती महामार्गावर उर्से टोल नाक्याजवळील आढे गावच्या हद्दीत (किमी 78) एका खासगी प्रवासी बसला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. टायर फुटल्याने बसला आग लागल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. या आगीत बस पूर्णपणे जळून खाक झाली आहे. ही घटना आज २७ एप्रिल रोजी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडली. या बसमधून ३६ प्रवासी प्रवास करत होते. बसचालक आणि प्रवासी यांनी प्रसंगावधान राखत बसमधून बाहेर पडल्याने मोठी दुर्घटना टळली.

 

 

याबाबत अधिक माहिती अशी कि, पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावरील मावळ तालुक्यातील आढे गावच्या हद्दीत मुंबईहून – पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या बसचा टायर फुटल्याने मोठा आवाज होऊन बसने पेट घेतला. आग लागल्यानंतर धुरांचे लोट दूरवर पसरले होते. या घटनेची माहिती मिळताच आयआरबी पेट्रोलिंग, देवदूत यंत्रणा, डेल्टा फोर्स, वडगाव वाहतूक पोलीस यंत्रणा, वडगाव नगरपंचायत अग्निशमन दल, तळेगाव दाभाडे नगरपरिषद अग्निशमन दल यांनी आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. आगीने रौद्र रूप धारण केले होते. सुमारे सव्वा तासानंतर आग पूर्णपणे आटोक्यात आली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, बस जळून खाक झाल्याने मोठी वित्तहानी झाली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!