लोणी काळभोर पोलिसांची धडाकेबाज कामगिरी! शिंदवणे येथील ‘या’ अट्टल गुन्हेगाराला एक वर्षासाठी नाशिकच्या कारागृहात केले स्थानबद्ध

उरुळी कांचन : गावठी हातभट्टी दारु व्यवसायाच्या आधारे लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दहशत माजविणाऱ्या सराईत एका गुन्हेगाराला नाशिक मध्यवर्ती कारागृहात एक वर्षा करीता स्थानबध्द करण्यात आल्याची माहिती काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय चव्हाण यांनी दिली.

सत्यवान शाखा राठोड (वय – ३३, रा. काळेशिवार, शिंदवणे, ता. हवेली, जि. पुणे) असे स्थानबद्ध करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
मिळालेल्या माहिती नुसार, सत्यवान राठोड हा प्रतिबंधक कारवाईस न जुमानता सातत्याने हातभट्टी गावठी दारू तयार करुन विक्रीचा व्यवसाय आणि त्यायोगे सार्वजनिक सुव्यवस्थेत बाधक असलेली कृत्ये करत होते.

तसेच सर्व सामान्य नागरीकांना धमकी देणे, शिवीगाळ करणे, वेळप्रसंगी मारहाण करुन आपली जबरदस्त दहशत निर्माण करणे अशा विघातक कृत्यांमुळे व गुंडगिरीमुळे लोकांच्या मनात असुरक्षिततेची भावना निर्माण झालेली आहे अशी महिती पोलिसांना मिळाली होती.

या माहितीच्या अनुशंगाने पोलीस निरीक्षक दत्तात्रय चव्हाण यांनी सदर गुन्हेगारावर एम पी डी ए कायदयान्वये स्थानबध्द करणे बाबतचा प्रस्ताव तयार करुन पोलीस आयुक्त, पुणे शहर यांचेकडे पाठविला असता पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी सत्यवान शाखा राठोड यास नाशिक मध्यवर्ती कारागृहात एक वर्षाकरीता स्थानबध्द करणे बाबतचे आदेश पारीत केले आहेत.
ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय चव्हाण, पोलीस निरीक्षक, (गुन्हे) सुभाष काळे, पोलीस उपनिरीक्षक किरण धायगुडे, पोलीस हवालदार गणेश सातपुते, पोलीस नाईक भोसले, पोलीस नाईक संदिप धनवटे यांनी केली आहे.