ब्रेकिंग! पुन्हा एकदा एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री होणार, बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ

पुणे : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर असताना महायुतीतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला होता. त्यानंतर उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांनी दिल्लीला जाऊन मंत्री अमित शहा यांची भेट घेतली होती. या दिल्ली वारीनंतर आता शिवसेनेच्या एका मंत्र्याने एकनाथ शिंदे हे पुन्हा मुख्यमंत्री होणार असल्याचे जाहीर विधान केले आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

शिवसेनेचे नेते आणि मंत्री दादा भुसे नंदुरबारमध्ये प्रचारासाठी आले होते. यावेळी बोलताना त्यांनी म्हटले की, जनतेला आजही विचारलं तर जनतेच्या मनातील मुख्यमंत्री कोण? जनता ही सांगेल की एकनाथ शिंदे. महाराष्ट्राने असा मुख्यमंत्री कधी पाहिला नाही ही वस्तुस्थिती आहे. काळजी करू नका परत या महाराष्ट्राचे नेतृत्व एकनाथ शिंदे साहेब करताना आपण सर्वजण पाहणार आहोत. असे त्यांनी स्पष्ट म्हटलं आहे.अगदी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून झोपडीतून आलेला माणूस मुख्यमंत्र्यांना भेटल्याशिवाय जात नव्हता. एकनाथ शिंदे प्रत्येक माणसाला भेटल्याशिवाय झोपायलाही जात नाहीत. उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब प्रत्येक सभेत सांगतात महाराष्ट्राच्या इतिहासात एवढ्या सह्या करणारा मुख्यमंत्री मी कधी पाहिला नव्हता असं म्हणत एकनाथ शिंदे पुन्हा एकदा मुख्यमंत्री होणार असल्याची भविष्यवाणी दादा भुसे यांनी केली आहे.

दरम्यान मंत्री दादा भुसे यांच्या या विधानामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बाहेर पडत भाजपसोबत युती करण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी भाजपने एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री बनवले होते. आता भुसे यांच्या विधानानंतर राज्याचे नेतृत्व पुन्हा एकदा एकनाथ शिंदेंकडे येणार का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

