ब्रेकिंग! शेतकऱ्यांसाठी महायुती सरकारचा मोठा निर्णय ; शेतकऱ्यांच्या कर्ज वसुलीला एक वर्षाची स्थगिती

पुणे : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती सरकारने शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. सरकारकडून शेतकऱ्यांच्या कर्ज वसुलीला एक वर्षाची स्थगिती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आता सरकारकडून बँकांना शेतकऱ्यांकडून कर्जाची वसुली न करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना आता पुढच्या वर्षी कर्ज वसुली करण्यास संधी मिळणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

मराठवाड्यासह राज्यातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये पूरस्थितीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. या शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी अशी जोरदार मागणी शिवसेनेसह विरोधी पक्षाने केली होती. त्यावर चालढकल करणाऱ्या महायुती सरकारने ऐन निवडणुकीत कर्जाच्या वसुलीला एक वर्षी स्थगिती देण्याचा निर्णय घेतला आहे .त्यामुळे आता शेतकऱ्यांना यंदा कर्ज भरावे लागणार नाही. यामुळे शेतकऱ्यांवर येणारा आर्थिक भार कमी होण्यास मदत होणार आहे. राज्य सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
काही दिवसांपूर्वी प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी शेतकरी कर्जमाफीसाठी नागपूरमध्ये आंदोलन केले होते. त्यावेळी सरकारने त्यांच्याशी चर्चा करून 30 जून 2026 ची कर्जमाफीसाठी डेडलाईन देण्यात आली आहे. याचा अर्थ 30 जून 2026 पर्यंत शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार आहे. सरकारच्या या निर्णयावर बच्चू कडू यांनी समाधान व्यक्त करत आंदोलन थांबवले होते. बच्चू कडू यांच्या आंदोलनात राज्यभरातील शेतकरी नेते सहभागी झाले होते, तसेच हजारोंच्या संख्येने शेतकरीही सामील झाले होते. शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश मिळाल्यानंतर राज्यभरातील शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला होता. त्यानंतर आता राज्य सरकारने शेतकऱ्यांना आणखी एक खुशखबर दिली आहे.
