शेअर बाजारात ‘ब्लॅक मंडे’! सेन्सेक्स ११०० अंकांनी कोसळला, गुंतवणूकदारांचे ८ लाख कोटींचे नुकसान; नेमकं कारण काय?

मुंबई : आठवड्याच्या पहिल्याच दिवशी भारतीय शेअर बाजारात जोरदार विक्रीचा दबाव पाहायला मिळाला. अमेरिका-इराणमधील वाढता तणाव आणि कच्च्या तेलाच्या दरातील उसळीचा थेट परिणाम बाजारावर झाला. दिवसअखेर सेन्सेक्स १,१२४ अंकांनी घसरून ७२,७७१.७२ वर, तर निफ्टी ३६० अंकांनी घसरून २२,७८०.२५ वर बंद झाला. दोन्ही निर्देशांक सुमारे १.५ टक्क्यांनी घसरले.
बाजारातील या घसरणीमुळे बीएसईवरील कंपन्यांच्या बाजारमूल्यात मोठी घट झाली आणि गुंतवणूकदारांच्या संपत्तीत सुमारे ८ लाख कोटी रुपयांची घट झाल्याचे वृत्त आहे. सकाळच्या व्यवहारातच सेन्सेक्समध्ये मोठी घसरण झाली होती. बाजार सुरू झाल्यानंतर अवघ्या काही मिनिटांत निर्देशांक ५०० हून अधिक अंकांनी खाली आला, तर निफ्टी २३ हजारांच्या खाली घसरला.

कच्च्या तेलाचा मोठा धक्का


या घसरणीमागे कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती हे प्रमुख कारण ठरले. अमेरिका आणि इराणमधील शांतता चर्चा ठप्प झाल्याने तेलाच्या पुरवठ्याबाबत चिंता वाढली. ब्रेंट कच्च्या तेलाचा दर १०६ ते १०८ डॉलर प्रति बॅरलच्या आसपास पोहोचला. भारत हा जगातील मोठ्या कच्चे तेल आयातदार देशांपैकी एक असल्याने तेल महागल्यास आयात खर्च, महागाई आणि कंपन्यांच्या नफ्यावर परिणाम होण्याची शक्यता बाजारात व्यक्त होत आहे.
अमेरिका-इराण तणावाचा बाजारावर परिणाम
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणकडून आलेला होर्मुझची सामुद्रधुनी खुली करण्याचा आणि संघर्ष थांबवण्याचा प्रस्ताव नाकारल्याचे वृत्त आहे. त्यामुळे जागतिक बाजारात अनिश्चितता वाढली आहे. त्याचवेळी अमेरिकन रोख्यांवरील परताव्यात वाढ आणि रुपयातील कमजोरी यामुळे भारतीय बाजारावर अतिरिक्त दबाव आला.
जवळपास सर्वच क्षेत्रांत विक्री
आजच्या सत्रात मोठ्या प्रमाणावर समभागांची विक्री झाली. बँकिंग, ऊर्जा, वाहन, बांधकाम आणि इतर प्रमुख क्षेत्रांमध्ये दबाव दिसून आला. आधीच भारतीय बाजार सलग सातव्या आठवड्यात घसरणीसह बंद झाल्यानंतर गुंतवणूकदार सावध होते. त्यात जागतिक घडामोडींमुळे विक्री आणखी वाढली.
दरम्यान, कच्च्या तेलाच्या किमती, अमेरिका-इराण संघर्ष, रुपयाची हालचाल आणि परदेशी गुंतवणूकदारांची विक्री यामुळे आगामी सत्रांमध्येही बाजारातील चढ-उतारांकडे गुंतवणूकदारांचे लक्ष राहणार आहे.