इंदापूरमध्ये भाजपचा मोठा धमाका! सोनाई परिवाराचे प्रवीण माने भाजपात, चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश…

मुंबई : इंदापूरमध्ये सोनाई परिवाराचे संचालक माजी जिल्हा परिषद बांधकाम सभापती प्रवीण माने यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. यामुळे याठिकाणी भाजपची ताकद वाढली आहे. यावेळी मंत्री चंद्रकांत पाटील, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण तसेच इतर नेते उपस्थित होते. प्रवीण माने यांनी इंदापूर विधानसभा अपक्ष म्हणून लढवली होती.
आता ते भाजपात गेले आहेत. त्यांच्यामुळे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांना पराभवाला सामोरे जावे लागले होते. भाजपात प्रवेश केल्यानंतर प्रवीण माने म्हणाले, रवींद्र चव्हाण, चंद्रकांत पाटील, राहुल कुल, धनंजय महाडिक, मयूर पाटील बाबासाहेब चवरे, सगळेच सहकारी मी सगळ्यांचे आभार मानतो. जगातील सर्वात मोठ्या पक्षात आम्हाला घेतलं, त्याबद्दल मी सगळ्यांचे आभार मानतो.
शक्तिशाली भारताला उभे करणारे नरेंद्र मोदी यांच्या कामात प्रेरित होऊन मी देवेंद्रभाऊंच्या नेतृत्वाखाली मी भाजपात प्रवेश करत आहे, आज महाराष्ट्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून नंबर एकला गेलेला आहे. आमच्या तालुक्यात भौगोलिक परिस्थिती चांगली आहे. नदी आहे, आम्हाला विकास कामाला मदत करावी.
सोनाईच्या माध्यमातून आम्ही हजारो कोटींची गुंतवणूक केली. 25 हजार लोकांना रोजगार दिला. मी सभापती असताना 300 कोटीची कामे केली, मी लोकांच्या आग्रहाने विधानसभा लढवली मला 40 हजार मत मिळाली. नंतर कार्यकर्ते म्हणाले, आपण भारतीय जनता पक्षात जावे, हेच रविदादा सामान्य कुटूंबातील प्रदेशाध्यक्ष झाले हे फक्त भारतीय जनता पक्षात होऊ शकते.
पक्ष मला जी जबाबदारी देईल, मी प्रामाणिकपणे 24 तास काम करेल, असा विश्वास देतो, आज काही लोकं म्हणतील पण माझा कोणता स्वार्थ नाही, मी सगळ्यांचे आभार व्यक्त करतो. घरोघरी जाऊन आम्ही काम करू, आमच्या कार्यकर्त्यांची कामे आपण करावीत, यावेळी माजी सभापती मयूर पाटील यांनी देखील भाजपात प्रवेश केला.