भाजपने डाव टाकला ; अजित पवारांना रोखण्यासाठी पुण्यात ‘या’ चार नेत्यांना उतरवलं रिंगणात..

पुणे : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झाल्या असताना भाजपने मोठा डाव टाकत महत्त्वाच्या शहरांपैकी एक असलेल्या पुणे शहरात चार मातब्बर नेत्यांना रिंगणात उतरवलं आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरोधात भाजपने मोठा डाव टाकला असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

भारतीय जनता पक्षाने निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यभर निवडणूक प्रमुखांची घोषणा केली आहे. पुणे शहराची धुरा माजी सभागृह नेते गणेश बीडकर यांच्याकडे सोपवण्यात आली आहे, तर पिंपरी-चिंचवडची जबाबदारी आमदार शंकर जगताप घेतील. पुणे जिल्ह्यासाठी निवडणूक प्रभारी म्हणून केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्त्यांमुळे पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील भाजपच्या ताकदीचा विचार करून या शहरांना विशेष महत्त्व दिल्याचे दिसून येते.
भाजपने राज्यभरातील सर्व जिल्ह्यांसाठी निवडणूक प्रमुख आणि प्रभारींची निवड केली आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपचे दोन आमदार आहेत आणि दोघांनाही वेगवेगळ्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत. आमदार महेश लांडगे यांच्याकडे पुणे उत्तर (मावळ) भागाची जबाबदारी असेल, तर आमदार राहुल कुल हे पुणे दक्षिण (बारामती) भागाचे नेतृत्व करतील.

निवडणूक प्रमुखांची यादी खालीलप्रमाणे:
– पुणे शहर: गणेश बीडकर
– पुणे उत्तर (मावळ): आमदार महेश लांडगे
– पुणे दक्षिण (बारामती): आमदार राहुल कुल
– पिंपरी-चिंचवड: आमदार शंकर जगताप
पुणे आणि पिंपरी-चिंचवड या भाजपच्या बालेकिल्ल्यांमध्ये ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. त्यामुळे या शहरांच्या प्रमुखांच्या नियुक्त्यांना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. आता आगामी निवडणुकीत बाजी कोण मारणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.