भाजपचं ठरलं! स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी मुख्यमंत्र्यांसह ४० नेत्यांची फौज मैदानात.. कोणकोण आहेत स्टार प्रचारक?

पुणे : राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर येऊन ठेपल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष जोरदार तयारी करत आहेत. त्यातच आता भारतीय जनता पक्षाने निवडणुकांसाठी ४० स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली. या यादीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह राज्यातील दिग्गज नेत्यांचा समावेश करण्यात आला आहे.

स्टार प्रचारकांच्या यादीत कोणाकोणाचा समावेश?
भाजपने जाहीर केलेल्या यादीत केंद्रीय आणि राज्य पातळीवरील अनुभवी नेत्यांसह आक्रमक चेहऱ्यांना स्थान दिले आहे. याचे प्रमुख नेतृत्व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याकडे असणार आहे. देवेंद्र फडणवीस आणि रवींद्र चव्हाण हे या निवडणुकांच्या प्रचाराची मुख्य धुरा सांभाळणार आहेत.तसेच नितीन गडकरी, पीयूष गोयल, मुरलीधर मोहोळ, रक्षा खडसे, तसेच राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे आणि राष्ट्रीय सहसंघटनमंत्री शिव प्रकाश हे केंद्रीय नेते निवडणुकीच्या प्रचारात दिसणार आहेत. तसेच चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, राधाकृष्ण विखे-पाटील, गिरीश महाजन, चंद्रशेखर बावनकुळे, अतुल सावे, गणेश नाईक, आणि जयकुमार रावल हे राजकीय नेतेही प्रचार करणार आहेत. यासोबतच नारायण राणे, अशोक चव्हाण, पंकजा मुंडे, आशिष शेलार, नितेश राणे, गोपीचंद पडळकर, शिवेंद्रराजे भोसले आणि मेघना बोर्डीकर हे नेतेही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा प्रचार करताना दिसणार आहेत.

राज्यातील २४६ नगरपालिका आणि ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकीसाठी येत्या २ डिसेंबरला मतदान होणार आहे. तर ३ डिसेंबरला लगेचच मतमोजणी होऊन निकाल जाहीर होणरा आहे. यामुळे आता राजकीय वातावरण तापू लागले आहे. त्याच जोशात भाजप आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आखाड्यात उतरणार आहे.