BJP : मोठी बातमी! भाजप ३० टक्के खासदारांची तिकिटे कापणार..!!
BJP : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत अतिशय महत्त्वाच्या घडामोडी घडत आहेत. भाजप मुख्यालयात पक्षाच्या निवडणूक समितीची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित आहेत. या बैठकीबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ३ वेळा खासदार असलेल्या उमेदवारांचं तिकीट कापलं जाणार आहे. त्यामुळे अशा पद्धतीने निवडून आलेल्या जवळपास २५ ते ३० टक्के खासदारांचं तिकीट कापलं जाणार आहे. भाजपकडून उमेदवार ठरवण्याचं काम युद्ध पातळीवर सुरु झाले आहे. BJP
तसेच भाजपकडून येत्या १० मार्चपूर्वी देशातल्या ३०० उमेदवारांची यादी जाहीर केली जाणार आहे. विशेष म्हणजे पक्षाच्या निवडणूक समितीच्या आजच्या बैठकीत १२५ जागांबाबत शिक्कामोर्तब केलं जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
उमेदवारांची निवड ‘अशी’ होईल
पहिला टप्पा व्हीआयपी उमेदवार = यामध्ये केंद्रीय मंत्री आणि इतर मोठ्या नेत्यांची उमेदवारी असणार
दुसरा टप्पा राज्यसभेतील खासदार = राज्यसभेतील विद्यमान आणि माजी खासदारांना लोकसभा निवडणुकीत उमेदवारी दिली जाणार
तिसरा टप्पा = पराभूत उमेदवार किंवा दोन नंबर क्रमांकाची मतं मिळालेल्या उमेदवारांची यादी
महाराष्ट्रातील सर्व खासदारांचे रिपोर्ट लिफाफ्यात बंद…
दरम्यान, भाजपमध्ये लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जोरदार घडामोडी घडत आहेत. महाराष्ट्रातील सर्व 23 भाजप खासदारांच्या कामाचा रिपोर्ट तयार करण्यासाठी भाजपने लोकसभा निरीक्षकांची एक समिती तयार केली होती.
ही समिती सर्व खासदारांच्या मतदारसंघांमध्ये जावून त्यांच्या कामाचा रिपोर्ट बनवणार होती. तसेच विद्यमान खासदारांऐवजी आणखी दोन नावं सूचवणार होती. या समितीने आपला रिपोर्ट तयार करुन बंद लिफाफ्यातून दिल्लीतील भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना पाठवला आहे.