आदित्य ठाकरे यांना आतापर्यंतचा सर्वात मोठा धक्का! अत्यंत जवळचा विश्वासू शिलेदार करणार शिंदे गटात प्रवेश
मुंबई : माजी मंत्री आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय राहुल कनाल हे ठाकरे गटाला सोडचिठ्ठी देणार आहेत. ते उद्या शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे. यामुळे ठाकरे गटाला हा एक मोठा धक्का मानला जात आहे.
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाला मोठं खिंडार पडणार असल्याचं सांगितलं जात आहे. मुंबईतच ठाकरे गटामध्ये पडझड सुरू झाल्याने शिवसैनिकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे.
राहुल कनाल हे आदित्य ठाकरे यांचे अत्यंत जवळचे मानले जातात. राहुल कनाल आणि आदित्य ठाकरे यांची मैत्री सर्वश्रृत आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून दोघांमध्ये वाद होत होते.
आमच्या मैत्रीत कोणी तरी भांडणं लावून देत असल्याची प्रतिक्रिया कनाल यांनी व्यक्त केली होती. कनाल हे युवा सेनेचं काम पाहायचे. गेल्या काही दिवसांपासून ते पक्षात अस्वस्थ होते. यामुळे त्यांनी हा निर्णय घेतला आहे.
याबाबतची बातमी आमदार नितेश राणे यांनी दिली. आदित्य ठाकरे यांचा निकटवर्तीय राहुल कनाल उद्या शिंदे गटात प्रवेश करणार आहे. हा ठाकरे गटाला धक्का आहेच, पण आदित्य ठाकरे यांनाही वैयक्तिक धक्का असल्याचे नितेश राणे यांनी म्हटले.
दरम्यान, कनाल हे वांद्रे पश्चिम मतदारसंघात राहतात. कनाल हे पक्षातून जाणार असल्याने वांद्रे पश्चिम येथील युवा सेनेच्या पदांना स्थगिती देण्यात आली आहे. ठाकरे गटाने ही स्थगिती दिली आहे.