अर्थखात्यावरून मोठा ट्विस्ट! सुनेत्रा पवारांना जबाबदारी मिळणार का? दिल्लीनंतर फडणवीसांचा सूचक इशारा


पुणे : राज्यातील महायुती सरकारमध्ये खातेवाटपावरून पुन्हा एकदा राजकीय चर्चांना वेग आला आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना अर्थखातं दिलं जाणार का, या प्रश्नावरून राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्ली दौऱ्यानंतर पहिल्यांदाच यावर प्रतिक्रिया दिली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार तसेच मंत्री आणि वरिष्ठ अधिकारी यांचे शिष्टमंडळ दिल्ली दौऱ्यावर होते. या दौऱ्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत राज्यातील कांदा प्रश्न, शेतकरी समस्या आणि प्रशासकीय विषयांवर चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे.

दिल्लीतील बैठकीनंतर पत्रकारांनी फडणवीस यांना सुनेत्रा पवार यांच्या कथित नाराजीबाबत प्रश्न विचारला. अर्थखातं अद्याप राष्ट्रवादीला न मिळाल्यामुळे त्यांनी नाराजी व्यक्त केल्याची चर्चा आहे. यावर फडणवीस म्हणाले की, अद्याप माझ्यापर्यंत अशी कोणतीही अधिकृत नाराजी आलेली नाही. त्या स्वतः याबाबत बोलतील, तेव्हाच मी प्रतिक्रिया देऊ शकतो.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची 26 मे रोजी मुंबईत बैठक झाली होती. या बैठकीतही अर्थखात्याच्या वाटपावर चर्चा झाल्याचे समोर आले आहे. अजित पवार उपमुख्यमंत्री असताना अर्थखातं राष्ट्रवादीकडे होते, मात्र सध्याच्या वाटपात हे खाते अद्याप पक्षाला मिळालेले नाही. त्यामुळे सुनेत्रा पवार यांना अर्थखातं मिळण्याची शक्यता वाढली आहे का, यावर राजकीय वर्तुळात तर्कवितर्क सुरू आहेत.

राजकीय सूत्रांच्या माहितीनुसार, महायुतीतील खातेवाटपाचा तिढा अजून पूर्णपणे सुटलेला नाही. काही महत्त्वाच्या खात्यांवर अंतिम निर्णय बाकी असून त्यावर वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू आहे. त्यामुळे आगामी दिवसांत मोठे राजकीय निर्णय होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, फडणवीस यांनी मात्र अत्यंत सावध भूमिका घेतली असून कोणतीही अधिकृत नाराजी किंवा मागणी माझ्यापर्यंत आलेली नाही, असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे सुनेत्रा पवारांना अर्थखातं मिळणार का, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!