शरद पवारांना मोठा धक्का ; निवडणुकीच्या तोंडावरच माजी गृहमंत्र्याच्या लेकाची पक्षाला सोडचिठ्ठी, कारण काय?

पुणे: आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर असताना राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांना मोठा धक्का बसला आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे सुपुत्र सलील देशमुख यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या सक्रीय सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी तडकाफडकी राजीनामा दिल्या असल्याने ते भाजप पक्षात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत.

समोर आलेल्या माहितीनुसार, ऐन निवडणुकीत सलील देशमुख यांनी पक्षाचे नेते शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे यांना राजीनामा पाठवून असून प्रकृतीच्या कारणास्तव आपण राजीनामा देत असल्याचे त्यांनी पत्रात लिहिले आहे.एकीकडे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका सुरू असताना अचानकपणे प्रकृतीचे कारण देत डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आराम करत असल्याचे ते म्हणाले. आराम करण्यासाठीच आपण सक्रीय सदस्यत्वाचा राजीनामा देत असल्याचे सलील देशमुख यांनी म्हटले आहे.मात्र राष्ट्रवादीचा राजीनामा देऊन उद्या दुसऱ्या पक्षात जाणार आहे का? असे विचारले असता, उद्याची परिस्थिती काय असेल ते माहित नाही. मात्र सध्या प्रकृतीच्या कारणांनी मी राजीनामा देत असल्याचे ते म्हणाले. अधोरेखित करण्यासारखी बाब म्हणजे पक्षांतर करणार नाही, असे ठामपणे त्यांनी सांगितलेले नाही. त्यामुळे सलील देशमुख भारतीय जनता पक्षात जाणार असल्याच्या चर्चा आहेत.

गेल्या विधानसभा निवडणुकीत सलील देशमुख यांनी काटोल मतदार संघातून राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून निवडणूक लढविली होती. मात्र या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. सलील देशमुख हे राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे सुपुत्र आहेत. ऐन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तोंडावर सलील देशमुख यांनी राजीनामा दिल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला आहे.

