मोठा दिलासा! शेतकरी कर्जमाफीचे पैसे ‘या’ तारखेनंतर थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार


मुंबई : राज्य सरकारच्या शेतकरी कर्जमाफी योजनेच्या अंमलबजावणीला वेग आला असून, प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोहोचल्याची माहिती कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी विधानसभेत दिली. आवश्यक प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आणि पुरवणी मागण्यांना मंजुरी मिळताच पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात कर्जमाफीची रक्कम थेट जमा करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

कृषिमंत्र्यांच्या माहितीनुसार, राज्यपालांची अंतिम मंजुरी मिळाल्यानंतर निधी वितरणाची प्रक्रिया तातडीने सुरू केली जाईल. त्यामुळे 5 जुलैनंतर कर्जमाफीचा निधी वितरित होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

सरकारने स्पष्ट केले आहे की, योजनेचा लाभ केवळ पात्रता निकष पूर्ण करणाऱ्या शेतकऱ्यांनाच दिला जाणार आहे. संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने राबविण्याचे नियोजन करण्यात आले असून, लाभार्थ्यांची पडताळणी करूनच निधी वितरित केला जाईल.

दरम्यान, कर्जमाफी योजनेतील अटी व निकषांबाबत विरोधी आणि सत्ताधारी सदस्यांनी केलेल्या सूचनांचा सकारात्मक विचार सुरू असल्याचेही कृषिमंत्र्यांनी सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत योजनेत आवश्यक सुधारणा करण्याबाबत चर्चा झाली असून, शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य देत निर्णय घेतले जात असल्याचे त्यांनी नमूद केले.

याशिवाय, केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध कृषी योजनांचा लाभ मिळवण्यासाठी ‘फार्मर आयडी’ अनिवार्य करण्यात आला आहे. ज्या शेतकऱ्यांनी अद्याप नोंदणी केलेली नाही, त्यांच्यासाठी गावपातळीवर विशेष नोंदणी शिबिरे आयोजित केली जाणार आहेत. त्यामुळे पात्र शेतकऱ्यांनी फार्मर आयडी नोंदणीसह आवश्यक कागदपत्रांची पूर्तता वेळेत करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!