पावसाचं मोठ संकट ; किती जणांचा मृत्यू? मुख्यमंत्री फडणवीसांनी यांनी सांगितला थेट आकडा, मंत्र्यांनाही महत्त्वाचे आदेश

पुणे : सध्या बीड, मराठवाडा, अहिल्यानगर यांसह अनेक भागांना मुसळधार पाऊस आणि अतिवृष्टीने झोडपून काढले आहे. त्यामुळे सर्वत्र पूर आला असून जनजीवन विस्कळीत झाले आहे..सध्या प्रशासनाकडून मदत आणि बचावकार्य वेगाने सुरु आहे. त्यातच आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या पूरस्थितीची सविस्तर माहिती सांगत मंत्र्यांना काही महत्त्वाचे आदेश दिले आहेत.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रात कुठे अतिवृष्टी झाली आहे, कुठे पूर आला आहे, कोणत्या भागात जनजीवन विस्कळीत झाले आहे, याबद्दलचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी अहिल्यानगर, जळगाव, सोलापूर, बीड आणि परभणी या भागात अतिवृष्टी झाली आहे. जवळपास यामध्ये ८ जणांचा मृत्यू झाला. तर १० जण जखमी झाले आहेत, अशी माहिती दिली.बीडमध्ये रेस्क्यू ऑपरेशन सुरु आहे. धाराशिवमध्येही रेस्क्यू ऑपरेशन सुरु असून २७ लोकांना हेलिकॉप्टरच्या मदतीने एनडीआरएफने बाहेर काढलं. २०० लोकांना अजून वेगवेगळ्या सुरक्षित ठिकाणी हलवलेलं आहे, अशी माहिती फडणवीस यांनी दिली आहे.
सध्या अनेक भागात ज्यांचे पुरामुळे नुकसान झालं अशा लोकांनाही मदतीचे आश्वासन देण्यात आले आहे. आज मंत्रिमंडळात याचा आढावा घेण्यात आला आहे. कोणत्या जिल्ह्यात काय परिस्थिती आहे, याचा आढावा घेतला आहे. उद्या पालकमंत्र्यांना किंवा मंत्र्यांना या पूरग्रस्त भागात त्यांनी भेटी द्यायच्या आहेत, अशी सूचना केली आहे. मी देखील काही भागांमध्ये जाणार आहे, अशाही सूचना मुख्यमंत्र्यांनी मंत्र्यांना दिल्या आहेत.
