मोठी बातमी! पुण्याचे प्रसिद्ध येवले अमृततुल्य अडचणीत; मालकावर गुन्हा दाखल, काय आहे कारण?

मुंबई: महाराष्ट्रात मागील काही वर्षांत चहामध्ये सर्वाधिक लोकप्रिय ठरलेला बँड म्हणजे येवले अमृततुल्य. मात्र आता या येवले कंपनीसह या कंपनीच्या संचालिकाविरुद्ध एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे आता अमृततुल्य अडचणीत आला आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, संचालकांनी कंपनीच्या व स्वतःच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून परवानगी न घेता एका चित्रपटातील क्लिप प्रसारित केल्याचा आरोप शेमारू कंपनीकडून तक्रारीत करण्यात आला आहे.या कंपनीकडे ‘गोलमाल’, ‘फिर हेराफेरी’ यासह अनेक चित्रपटांचे स्वामित्व हक्क आहेत. असं असताना येवले कंपनीने परवानगी न घेता या चित्रपटांमधील काही प्रसंग घेऊन ‘मिम’ तयार केले व आपल्या ब्रँडच्या व्यावसायिक फायद्यासाठी समाजमाध्यमांवर पसरवल्याचा आरोप करण्यात आला आहे. शेमारू कंपनीच्या ही बाब लक्षात आल्यानंतर शेमारूने येवले कंपनीला जानेवारी महिन्यात नोटीस पाठवून संबंधित चित्रपटांचे स्वामित्व हक्क आपल्याकडे असून मिम तातडीने हटवा, असं सूचित केलं होतं. परंतु तरीही येवले कंपनीने मिम हटवले नाहीत. त्यामुळे आमचं 50 लाख रुपयांचे नुकसान झालं, असा दावा शेमारू कंपनीने तक्रारीत केल्याच समोर आलं आहे.

दरम्यान शेमारू कंपनीच्या तक्रारीनंतर एमआयडीसी पोलिसांकडून कंपनीसह नवनाथ येवले, मंगेश येवले, गणेश येवले, नीलेश येवले व तेजस येवले यांच्याविरुद्ध प्रतिलिपी अधिकार अधिनियमासह भारतीय न्याय संहितेतील विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

