मोठी बातमी! सर्वसामान्य लोकांना मोठा दिलासा, पेट्रोलच्या दरात 5 रुपयांची कपात, डिझेलही झालं स्वस्त, जाणून घ्या..

मुंबई : इंधन दरवाढीने सर्वसामान्यांसह उद्योग क्षेत्राचेही बजेट कोलमडले असताना आता मोठा दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. नायरा एनर्जीच्या देशभरातील पेट्रोल पंपांवर पेट्रोल प्रतिलिटर 5 रुपये आणि डिझेल प्रतिलिटर 3 रुपये स्वस्त करण्यात आले आहे. कंपनीच्या देशभरातील सुमारे 7,000 पेट्रोल पंपांवर हे नवे दर लागू झाले आहेत.

गेल्या काही आठवड्यांत आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ झाल्याने देशांतर्गत इंधनाचे दरही वाढले होते. त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत अनुक्रमे 7.50 रुपये आणि 7.60 रुपये प्रति लिटर वाढ झाली होती. मुंबईमध्ये सध्या पेट्रोलचा दर 111.21 रुपये, तर डिझेलचा दर 97.83 रुपये प्रति लिटर आहे.
दरम्यान, केंद्र सरकारने 1 जुलैपासून पेट्रोल आणि डिझेल विक्रीवरील तात्पुरते निर्बंध हटवण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी व्यावसायिक वापरासाठी रिटेल पंपांवरून इंधन खरेदीवर काही मर्यादा घालण्यात आल्या होत्या. प्रति ग्राहक 200 लिटर डिझेल विक्रीची मर्यादा लागू करण्यात आली होती. ब्लॅक मार्केटिंग रोखण्यासाठी आणि पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी हे निर्बंध लागू करण्यात आले होते.

याशिवाय, व्यावसायिक वापराच्या 19 किलोच्या एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात 183.50 रुपयांची कपात करण्यात आली आहे. तसेच 5 किलोच्या एलपीजी सिलेंडरच्या दरातही 13 रुपयांची घट करण्यात आली आहे. या दरकपातीनंतर दिल्लीमध्ये 19 किलोच्या सिलेंडरची किंमत 2,930 रुपये, तर 5 किलोच्या सिलेंडरची किंमत 808.50 रुपये झाली आहे. हे नवे दर बुधवार, 1 जुलैपासून लागू झाले आहेत.
