रेल्वे प्रवाशांसाठी मोठी बातमी! पुणे यार्डात रविवारी 9 तासांचा मेगा ब्लॉक; 7 गाड्या रद्द, अनेकांच्या मार्गात मोठा बदल


पुणे : रेल्वेने प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. पुणे रेल्वे यार्डात रविवारी (2 ऑगस्ट) डीडीएस पॉइंट्सच्या तांत्रिक कामासाठी तब्बल 9 तासांचा वाहतूक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे.

सकाळी 8 ते सायंकाळी 5 या कालावधीत हा मेगा ब्लॉक राहणार असून याचा परिणाम पुणे स्थानकावरील रेल्वे वाहतुकीवर होणार आहे. अनेक लोकल आणि एक्स्प्रेस गाड्या रद्द करण्यात आल्या असून काही लांब पल्ल्याच्या गाड्या पुणे स्थानकाऐवजी खडकी, शिवाजीनगर, हडपसर आणि दौंड स्थानकावरून धावणार आहेत.

रेल्वे प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, पुणे-दौंड मार्गावरील रेल्वे यार्डात डीडीएस पॉइंट क्रमांक 232 आणि 226 बदलून नवीन 60 किलो क्षमतेचे पॉइंट बसविण्याचे काम करण्यात येणार आहे. या कामासोबतच सिग्नल यंत्रणा, वीज व्यवस्था आणि इतर तांत्रिक कामेही केली जाणार आहेत. त्यामुळे ब्लॉकच्या कालावधीत पुणे यार्डाकडे जाणारी अप मेन लाइन, प्लॅटफॉर्म क्रमांक 1 तसेच लाइन क्रमांक 1 ते 6 वरील रेल्वे वाहतूक पूर्णपणे बंद राहणार आहे.

या ब्लॉकचा सर्वाधिक फटका पुणे आणि मुंबईदरम्यान प्रवास करणाऱ्या तसेच उपनगरीय रेल्वे सेवांचा वापर करणाऱ्या प्रवाशांना बसणार आहे. पुणे-तळेगाव, तळेगाव-पुणे, पुणे-लोणावळा, लोणावळा-शिवाजीनगर लोकल, पुणे-दौंड डीईएमयू तसेच सीएसएमटी मुंबई-पुणे एक्स्प्रेस (11007) आणि पुणे-सीएसएमटी मुंबई एक्स्प्रेस (11008) या गाड्यांसह एकूण सात गाड्या पूर्णपणे रद्द करण्यात आल्या आहेत.

याशिवाय अनेक लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या मार्गातही बदल करण्यात आला आहे. जयपूर-पुणे एक्स्प्रेस, नागपूर-पुणे एक्स्प्रेस, अमरावती-पुणे एक्स्प्रेस, जम्मू तवी-पुणे एक्स्प्रेस आणि सीएसएमटी-पुणे एक्स्प्रेस या गाड्या पुणे स्थानकापर्यंत न जाता खडकी, हडपसर, शिवाजीनगर किंवा दौंड स्थानकापर्यंतच धावणार आहेत. काही गाड्या या स्थानकांवरूनच पुढील प्रवासासाठी सुटतील.

रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना प्रवासापूर्वी आपल्या गाडीचे अद्ययावत वेळापत्रक आणि सुटण्याचे स्थानक तपासण्याचे आवाहन केले आहे. विशेषतः रविवारच्या दिवशी प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा हेल्पलाइनवर माहिती घेऊनच घराबाहेर पडावे, अन्यथा बदललेल्या वेळापत्रकामुळे गैरसोय होण्याची शक्यता आहे.

पूर्णपणे रद्द करण्यात आलेल्या गाड्या

पुणे – तळेगाव लोकल
तळेगाव – पुणे लोकल
पुणे – लोणावळा लोकल
लोणावळा – शिवाजीनगर लोकल
11007 सीएसएमटी मुंबई – पुणे एक्स्प्रेस
पुणे – दौंड डीईएमयू
11008 पुणे – सीएसएमटी मुंबई एक्स्प्रेस

या एक्स्प्रेस गाड्यांच्या मार्गात बदल

जयपूर – पुणे एक्स्प्रेस
नागपूर – पुणे एक्स्प्रेस
अमरावती – पुणे एक्स्प्रेस
जम्मू तवी – पुणे एक्स्प्रेस
सीएसएमटी – पुणे एक्स्प्रेस

रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना घरातून निघण्यापूर्वी आपल्या गाडीचे सुटण्याचे स्थानक, वेळ आणि सद्यस्थिती तपासण्याचा सल्ला दिला आहे. रविवारच्या मेगा ब्लॉकमुळे पुणे विभागातील रेल्वे वाहतुकीवर मोठा परिणाम होणार असल्याने प्रवाशांनी नियोजन करूनच प्रवास करावा.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!