पुणेकरांसाठी मोठी बातमी! मुसळधार पावसाने इंद्रायणीला पूर; खडकवासला धरणसाखळीत किती टक्के पाणीसाठा?

पुणे : पुण्यात गेल्या २४ तासांपासून मुसळधार पाऊस सुरू असून शहरासह ग्रामीण भागातही जोरदार सरी कोसळत आहेत. सततच्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणसाखळीतील पाणीसाठ्यातही झपाट्याने वाढ होत आहे. धरणातील जलसाठा वाढत असल्याने धरण परिसरातील नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे.

पाटबंधारे विभागाच्या माहितीनुसार, खडकवासला धरणसाखळीत सध्या १०.६७ टीएमसी पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यामध्ये खडकवासला धरणात १.२४ टीएमसी, पानशेतमध्ये ४.२० टीएमसी, वरसगावमध्ये ४.६२ टीएमसी आणि टेमघर धरणात ०.६२ टीएमसी पाणीसाठा आहे. एकूण धरणसाखळीतील साठा जलाशयांच्या क्षमतेच्या ३६.६३ टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे.
मात्र, गेल्या वर्षी याच दिवशी धरणसाखळीत १९.०८ टीएमसी म्हणजेच ६५.४६ टक्के पाणीसाठा होता. त्या तुलनेत यंदा सुमारे ८ टीएमसीने कमी पाणी धरणांमध्ये साठले आहे. मागील सात दिवसांत पाणीसाठ्यात वाढ झाली असली, तरी तो अद्याप गेल्या वर्षाच्या तुलनेत कमी असल्याचे दिसून येत आहे.

खडकवासला धरण ६२ टक्के भरले
खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे ७ जुलै २०२६ रोजी पहाटे ४ वाजेपर्यंत धरणात ६२ टक्के पाणीसाठा झाल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास पुढील काही तासांत धरणातील पाणीसाठा ८० टक्क्यांहून अधिक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दरम्यान, पावसाचा जोर कायम राहिल्यास खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून कधीही पाण्याचा विसर्ग सुरू केला जाऊ शकतो, असा इशाराही पाटबंधारे विभागाने दिला आहे. त्यामुळे नागरिकांनी नदीपात्रात जाणे टाळावे. तसेच नदीपात्रात असलेली जनावरे, साहित्य किंवा इतर वस्तू तातडीने सुरक्षित ठिकाणी हलवाव्यात आणि प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.