शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमुक्तीची तिसरी यादी जाहीर; पैसे मिळवण्यासाठी पात्र शेतकऱ्यांनी ‘हे’ काम करणं अनिवार्य

मुंबई : राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत पात्र लाभार्थी शेतकऱ्यांची तिसरी यादी जाहीर करण्यात आली आहे.

या यादीत राज्यातील ३ लाख ५१ हजार १९२ शेतकऱ्यांचा समावेश आहे. त्यामुळे पात्र शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ मिळण्याची प्रक्रिया पुढे सरकली आहे.
या पार्श्वभूमीवर सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी लाभार्थी शेतकऱ्यांना महत्त्वाचे आवाहन केले आहे. शेतकऱ्यांनी आपल्या कर्जखात्यावरील थकबाकीची खातरजमा करून जवळच्या आपले सेवा केंद्रात आधार प्रमाणीकरण पूर्ण करावे, असे त्यांनी सांगितले.


कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार कर्जमुक्तीचा लाभ?
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत १ एप्रिल २०१९ ते ३१ मार्च २०२५ या कालावधीत वितरित झालेली, ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत थकीत असलेली आणि ३१ मार्च २०२६ पर्यंत परतफेड न झालेली पीककर्जे पात्रतेनुसार विचारात घेतली जात आहेत. यामध्ये पुनर्गठित आणि फेरपुनर्गठित कर्जांचाही समावेश असून, दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमुक्तीचा लाभ देण्याची तरतूद आहे.
आतापर्यंत २४.६७ लाख शेतकऱ्यांच्या याद्या प्रसिद्ध
या योजनेची अंमलबजावणी ऑनलाइन संगणकीय प्रणालीद्वारे केली जात आहे. यासाठी महाआयटीची नियुक्ती करण्यात आली असून, बँकांनी योजनेच्या पोर्टलवर एकूण ३१.१७ लाख थकीत कर्जखात्यांची माहिती अपलोड केली आहे.
संगणकीय प्रक्रियेनंतर आतापर्यंत तीन याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत.
पहिली यादी: २४ जुलै २०२६ रोजी १६.९६ लाख शेतकरी.
दुसरी यादी: ११ सप्टेंबर २०२६ रोजी ४.२० लाख शेतकरी.
तिसरी यादी: १२ ऑक्टोबर २०२६ रोजी ३.५१ लाख शेतकरी.
अशा प्रकारे आतापर्यंत एकूण २४.६७ लाख लाभार्थी शेतकऱ्यांच्या याद्या आधार प्रमाणीकरणासाठी प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत.
कोणत्या विभागातील किती शेतकऱ्यांचा समावेश?
तिसऱ्या यादीतील विभागनिहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे.
छत्रपती संभाजीनगर विभाग: २ लाख ६ हजार ४५० शेतकरी
अमरावती विभाग: ८५ हजार ७६ शेतकरी
नागपूर विभाग: ३० हजार ७३८ शेतकरी
नाशिक विभाग: १४ हजार २४४ शेतकरी
पुणे विभाग: ११ हजार ९२८ शेतकरी
कोकण विभाग: २ हजार ७५६ शेतकरी
शेतकऱ्यांनी पुढे काय करावे?
तिसऱ्या यादीतील पात्र शेतकऱ्यांच्या जिल्हानिहाय याद्या संबंधित बँक शाखा, विकास संस्था आणि ग्रामपंचायतींमध्ये प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपले नाव यादीत आहे का, याची खात्री करून घ्यावी.
यानंतर कर्जखात्यावरील ३१ मार्च २०२६ रोजीची थकबाकी तपासून जवळच्या आपले सेवा केंद्रात आधार प्रमाणीकरण पूर्ण करावे. या तारखेपर्यंतची थकबाकी यादीत नमूद करण्यात आली असून, १ एप्रिल २०२६ पासूनचे पुढील व्याज आणि इतर खर्च माफ करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
राष्ट्रीयीकृत आणि व्यापारी बँकांच्या यादीतील काही शेतकऱ्यांची थकबाकी दोन लाख रुपयांपेक्षा अधिक असली, तरी शासनाच्या ‘हेअर कट’ धोरणानुसार संबंधित कर्जे पूर्णपणे निरंक करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
तसेच, मृत लाभार्थी तसेच वयस्कर आणि बोटांचे ठसे नोंदवण्यात अडचण येणाऱ्या लाभार्थ्यांना कर्जमुक्तीचा लाभ देण्यासाठी १९ ऑगस्ट २०२६ रोजी मानक कार्यप्रणाली (एसओपी) जारी करण्यात आली आहे.
आधार प्रमाणीकरण पूर्ण झाल्यानंतर कर्जमुक्तीची रक्कम संबंधित शेतकऱ्यांच्या कर्जखात्यावर जमा करण्यात येणार आहे. त्यामुळे पात्र शेतकऱ्यांनी आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी केले आहे.
