मोठी बातमी! पुण्यातील बंडू आंदेकरच्या घरी धाड टाकताच मोठं घबाड, 77 तोळे सोनं अन…

पुणे: पुण्यातील टोळीयुद्धातून झालेल्या आयुष कोमकर खून प्रकरणाने सर्वत्र खळबळ उडाली. या प्रकरणातील आरोपी बंडू आंदेकर आणि त्याच्या साथीदारांवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. त्यानंतर आता आंदेकर यांच्या घरावर गुन्हे शाखेने धाड टाकली असून त्यात 77 तोळे सोन्याचे दागिने, अडीच लाखांची रोकड, चांदी, मोटार, तसेच जमीन व्यवहाराशी संबंधित करारनामे, कर पावत्या व बँक कागदपत्रे असा कोट्यवधींचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आयुष कोमकर खून प्रकरणात गुन्हे शाखेने आंदेकर टोळीच्या म्होरक्या सूर्यकांत उर्फ बंडूअण्णा आंदेकर याच्या पुण्यातील घरावर छापा टाकला. यात सोने, रोकड, चांदी आणि जमीन व्यवहाराशी संबंधित कागदपत्रांचा समावेश असून त्यातून 21 हजारांची रोकड, 16 मोबाइल संच आणि दागिन्यांच्या पावत्या पोलिसांनी जप्त केल्या.तसेच पोलिसांनी आंदेकरची मुलगी आणि इतर साथीदारांच्या घरावरही झडती घेतली असून आंदेकरच्या घरात मोठं घबाड पोलिसांच्या हाती लागलं आहे. यामुळे पुण्यात खळबळ उडाली आहे.

नाना पेठेतील टोळीयुद्ध व कौटुंबिक वादातून अभियांत्रिकी विद्यार्थी आयुष कोमकर याचा खून करण्यात आला होता. या प्रकरणी आंदेकर टोळीचा म्होरक्या सूर्यकांत उर्फ बंडू अण्णा आंदेकर याच्यासह 13 साथीदारांविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मकोका) कारवाई करण्याचे आदेश पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले आहेत. त्यानंतर गुन्हे शाखेने केलेल्या या मोठ्या कारवाईने आंदेकर यांच्या अडचणी वाढल्या आहेत.

दरम्यान, बंडू आंदेकर , नातू तुषार वाडेकर, स्वराज वाडेकर, मुलगी वृंदावनी वाडेकर, अमन पठाण, सुजल मेरगू, अमित पाटोळे आणि यश पाटील यांना अटक करण्यात आली. तर, कृष्णा आंदेकर, शिवम आंदेकर, लक्ष्मी आंदेकर, अभिषेक आंदेकर फरार आहेत.
