पालकांच्या खिशाला मोठा फटका! शालेय साहित्याच्या दरात मोठी वाढ; जाणून घ्या किती वाढल्या किंमती..

पुणे : नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वीच पालकांच्या खिशाला मोठा फटका बसणार आहे. वह्या, पुस्तके, गाईड, वर्कबुक, शालेय गणवेश आणि इतर शैक्षणिक साहित्यांच्या किमतींमध्ये यंदा लक्षणीय वाढ झाली आहे.

वाढत्या इंधनदरांसह कागद निर्मितीसाठी लागणाऱ्या कच्च्या मालाच्या महागाईमुळे शालेय साहित्याच्या किंमती तब्बल 20 ते 25 टक्क्यांनी वाढल्याची माहिती समोर आली आहे.
जागतिक स्तरावरील युद्धजन्य परिस्थितीमुळे तेलाच्या किमती सातत्याने वाढत असून त्याचा थेट परिणाम देशातील डिझेल-पेट्रोल दरांवर झाला आहे. परिणामी वाहतूक खर्च वाढल्याने बाजारात उपलब्ध होणाऱ्या शालेय साहित्याच्या किंमतीही वाढल्या आहेत.

विशेषतः कागदासाठी लागणाऱ्या पल्प आणि इतर कच्च्या मालाच्या दरात आंतरराष्ट्रीय बाजारात वाढ झाल्याने वह्यांच्या किंमती गेल्या वर्षाच्या तुलनेत 10 ते 15 टक्क्यांनी वाढल्या आहेत. जूनपासून नवीन शैक्षणिक सत्र सुरू होत असल्याने पुणे शहरातील बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी गर्दी वाढू लागली आहे. मात्र वाढलेल्या दरांमुळे पालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

मुलांच्या शिक्षणासाठी आवश्यक साहित्य खरेदी करणे अपरिहार्य असल्याने अनेक कुटुंबांचे मासिक आर्थिक नियोजन विस्कळीत होत असल्याचे दिसून येत आहे. वह्या आणि पाठ्यपुस्तकांसोबतच गाईड, वर्कबुक, प्रोजेक्ट साहित्य आणि होमवर्कसाठी लागणाऱ्या वस्तूंच्या किंमतीतही 20 टक्क्यांहून अधिक वाढ झाल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. त्यामुळे यंदाचा एकूण शालेय खर्च मोठ्या प्रमाणात वाढला आहे.
दरम्यान, शालेय गणवेशाच्या किमतींमध्येही 10 ते 20 टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे. गणवेशासाठी लागणारे कापड महागल्याने तसेच शिवणकामाच्या मजुरीत वाढ झाल्याने पालकांना अतिरिक्त आर्थिक भार सहन करावा लागत आहे. आधीच महागाईच्या दबावाखाली असलेल्या मध्यमवर्गीय आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांसाठी ही परिस्थिती अधिक कठीण ठरत असल्याची भावना पालकांकडून व्यक्त केली जात आहे.