ठाकरेंना मोठा धक्का; बड्या नेत्यावर कोट्यवधी रुपयांच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल ; काय आहे प्रकरण?

पुणे : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर असताना शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. ठाकरे गटाचे माजी खासदार उन्मेष भैय्यासाहेब पाटील यांच्यासह चौघावंर देवगिरी नागरी सहकारी बँकेची 5 कोटीहुन अधिक रुपयाची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.त्यांच्यावर हा गुन्हा चाळीसगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात दाखल झाल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

काय आहे प्रकरण?

शिवसेना ठाकरे गटाचे नेते माजी खासदार उन्मेष भैय्यासाहेब पाटील यांच्यासह चार जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्यावर छत्रपती संभाजीनगर येथील देवगिरी नागरी सहकारी बँक लिमिटेडच्या चाळीसगाव शाखेची तब्बल ५ कोटी ३३ लाख ८५ हजार ३५६ रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. उमंग व्हाईट गोल्ड प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या नावाने घेतलेले औद्योगिक कर्ज न भरल्याने ते एनपीए झाले होते. बँकेकडून संधी देऊनही परतफेड न केल्याने बँकेने कार्यवाही सुरू केली. मात्र, या दरम्यान बँकेकडे गहाण ठेवलेली मशिनरी कंपनीच्या संचालकांनी संगनमताने विकल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यानुसार बँकेच्या चाळीसगाव शाखेचे व्यवस्थापक जीवन राजूरकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून उन्मेष पाटील, संजय धनकवडे, प्रशांत वाघ आणि प्रमोद जाधव यांच्या विरोधात फसवणुकीसह विविध कलमान्वये चाळीसगाव ग्रामीण पोलिसात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

दरम्यान, मंत्री गिरीश महाजन आणि उन्मेष पाटील यांच्यात अलीकडेच भूखंड प्रकरणावरून आरोप-प्रत्यारोप रंगले होते. त्यावेळी मंत्री गिरीश महाजन यांनी उन्मेष पाटील यांच्यावर त्यांनी स्टेट बँकेसह अन्य एका बँकेला गंडवल्याचा गंभीर आरोप केला होता. या आरोपाच्या अवघ्या तीन दिवसांनंतरच हा गुन्हा दाखल झाला आहे. या कारवाईची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे. नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटासाठी ही मोठी अडचण मानली जात आहे.
