भाजपला मोठा धक्का ; शेकडो कार्यकर्त्यांसह ‘या ‘नेत्याचा पक्षाला रामराम करत शिवसेनेत प्रवेश..

पुणे : विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर महाविकास आघाडीमधील अनेक दिग्गज नेत्यांनी महायुतीमध्ये प्रवेश केला आहे.आता स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका तोंडावर असताना देखील मोठ्या प्रमाणात पक्षांतर सुरू झालं आहे. अशातच आता मीरा-भाईंदरमध्ये भाजपला मोठा धक्का बसला आहे. भाजपा कामगार मोर्चाचे प्रदेश सचिव मनोज राणे यांनी पक्षाला रामराम करत शिवसेनेत प्रवेश केला आहे. मनोज राणे हे मंत्री नितेश राणे यांचे खंदे समर्थक म्हणून ओळखले जातात. हा भाजपसाठी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांपूर्वी मोठा धक्का मानला जात आहे.

भाजपा कामगार मोर्चाचे प्रदेश सचिव मनोज राणे यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश केला आहे. मनोज राणे यांच्या पक्षप्रवेशामुळे मीरा-भाईंदरमध्ये शिवसेनेची ताकत वाढली आहे. शिवसेना नेते प्रताप सरनाईक यांच्या मार्गदर्शनाखाली मनोज राणे यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे.दरम्यान राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था या महायुती म्हणूनच लढवल्या जाणार असल्याचं अनेकदा महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. मात्र तरी देखील पक्षप्रवेश सुरूच आहे तर दुसरीकडे अजूनही महाविकास आघाडीचं चित्र अद्याप स्पष्ट झालेलं नाही

दरम्यान आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी शिवसेना ठाकरे गट आणि मनसेची युती होणार असल्याची देखील चर्चा सुरू आहे, त्यामुळे या निवडणुकीबाबत प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.

