‘लाडक्या बहिणीं’ना मोठा धक्का! तब्बल 92 लाख नावे यादीतून वगळली; ‘या’ जिल्ह्यात सर्वाधिक अपात्र महिला

मुंबई : ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’बाबत मोठी अपडेट समोर आली आहे. योजनेतील लाभार्थी महिलांची पडताळणी आणि ई-केवायसी प्रक्रियेनंतर तब्बल 92 लाखांहून अधिक महिलांची नावे लाभार्थी यादीतून वगळण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.

सरकारकडून यापूर्वी सुमारे 80 लाख महिलांची नावे कमी होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. मात्र, आता पडताळणी प्रक्रियेनंतर अपात्र ठरलेल्या महिलांची संख्या 92 लाखांपेक्षा अधिक असल्याचे सांगण्यात येत आहे.
अनेक जिल्ह्यांतील महिलांची नावे यादीतून कमी करण्यात आली असून, बीड जिल्ह्यातील अपात्र ठरलेल्या महिलांची संख्या सर्वाधिक असल्याचे समोर आले आहे. एकट्या बीड जिल्ह्यात सुमारे 28 लाख महिला योजनेसाठी अपात्र ठरल्याची माहिती आहे.

दरम्यान, चुकीच्या पद्धतीने नावे वगळण्यात आल्याच्या तक्रारींची चौकशी करण्यात येईल, असे सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

योजनेत पारदर्शकता आणण्यासाठी ई-केवायसी, कागदपत्रांची पडताळणी आणि उत्पन्नाच्या निकषांची तपासणी करण्यात आली. ज्या महिलांनी ई-केवायसी पूर्ण केली नाही किंवा योजनेच्या अटी पूर्ण केल्या नाहीत, त्यांचा हप्ता बंद करण्यात आला आहे.
पडताळणीत सुमारे 12 लाख महिलांचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांच्या मर्यादेपेक्षा जास्त असल्याचे आढळले. तसेच 4.5 लाखांहून अधिक महिलांचे वय 65 वर्षांपेक्षा जास्त असल्याचे समोर आले आहे.
याशिवाय काही पुरुषांनीही या योजनेचा लाभ घेण्याचा प्रयत्न केल्याचे आढळून आले. छाननीनंतर सुमारे 14 हजार पुरुषांचे अर्ज बाद करण्यात आल्याची माहिती आहे.