‘उद्या काय होणार हे गणपती बाप्पाच सांगतील’; राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर भुजबळांचं सूचक वक्तव्य, म्हणाले- राजकारणात काहीही घडू शकतं


नाशिक : राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या संभाव्य विलिनीकरणाची चर्चा सुरू असतानाच मंत्री छगन भुजबळ यांच्या एका वक्तव्याने पुन्हा राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. राष्ट्रवादीच्या भविष्यातील वाटचालीबाबत थेट भूमिका स्पष्ट न करता “उद्या काय होणार, कुठल्या पक्षाचं काय होणार, हे आज सांगणं कठीण आहे. उद्या काय होणार हे गणपती बाप्पाच सांगतील,” असं भुजबळ म्हणाले. त्यामुळे त्यांच्या या सूचक वक्तव्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.

राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबाबत प्रश्न विचारला असता भुजबळ यांनी महाराष्ट्राच्या राजकारणातील यापूर्वीच्या फाटाफुटींचा संदर्भ दिला. “भुजबळ असे शिवसेना सोडतील, असं वाटलं होतं का? शिंदे असे अचानक उद्धवजींना सोडून जातील, असं स्वप्नात तरी वाटलं होतं का? तसंच राष्ट्रवादीतही झालं,” असं ते म्हणाले. राजकारणात पुढे कोणता निर्णय किंवा कोणती राजकीय घडामोड होईल, याचा अंदाज आत्ताच बांधता येणार नाही, असाच त्यांच्या वक्तव्याचा सूर होता.

पक्षफुटीबाबतही भुजबळ यांनी आपली भूमिका मांडली. “कोणीही फुटणं ही आनंदाची गोष्ट नसते. ज्या पक्षात आपण काम करतो, त्यापासून दूर जाणं सोपं नसतं; पण अशा गोष्टी घडतात,” असं त्यांनी सांगितलं. त्यामुळे राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांचं विलिनीकरण होणार की नाही, यावर त्यांनी कोणताही थेट निर्णय जाहीर केलेला नाही. मात्र, भविष्यातील राजकीय घडामोडी नाकारताही येणार नसल्याचे संकेत त्यांच्या वक्तव्यातून मिळाले.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसची सरकारमधील पकड सुटल्याचंही भुजबळ यांनी म्हटलं. अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर सुनेत्रा पवार यांच्यावर पक्षाची तसेच सरकारमधील जबाबदारी अचानक आली. “सुनेत्रा वहिनी त्यासाठी तयार नव्हत्या. अख्ख्या पक्षाची आणि सरकारमधील जबाबदारी त्यांच्यावर आली आहे. दादांचा वेग पकडायला थोडा वेळ लागतो,” असं भुजबळ म्हणाले. अचानक मोठी जबाबदारी आल्यानंतर ती सांभाळण्यासाठी काही काळ जाणं स्वाभाविक असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.

याच पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचं अधिवेशन होणार असल्याची माहिती भुजबळ यांनी दिली. पक्षाची सध्याची परिस्थिती, संघटनात्मक वाटचाल आणि पुढील राजकीय दिशा याकडे या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर लक्ष लागलं आहे.

दरम्यान, राष्ट्रवादीच्या संभाव्य विलिनीकरणाच्या चर्चेवर यापूर्वी मंत्री दत्ता भरणे यांनीही पक्षाची भूमिका मांडली होती. सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी मजबूत असल्याचं सांगताना, विलिनीकरणासारख्या महत्त्वाच्या निर्णयात सुनेत्रा पवार यांचा निर्णय अंतिम असेल, असं त्यांनी म्हटलं होतं.

त्यामुळे राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांच्या विलिनीकरणाच्या चर्चेला भुजबळांच्या ताज्या वक्तव्यामुळे पुन्हा वेग आला असला, तरी प्रत्यक्ष विलिनीकरणाबाबत अद्याप कोणताही अंतिम निर्णय समोर आलेला नाही. आता नाशिकच्या अधिवेशनात पक्षाच्या भविष्यातील राजकीय वाटचालीबाबत काय भूमिका मांडली जाते, याकडे लक्ष लागलं आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!