“शिवभक्तांची वाट पाहणारी भीमाशंकराची पायरी… पण 31 मेपर्यंत मंदिर बंदच; 288 कोटींची कामे अंतिम टप्प्यात”

नाशिक : “कधी उघडणार पुन्हा दर्शनाचे दरवाजे?” असा प्रश्न हजारो शिवभक्तांच्या मनात निर्माण झाला आहे. सिंहस्थ कुंभमेळा 2027 च्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या विकासकामांमुळे श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिर 31 मे 2026 पर्यंत बंद ठेवण्यात आले असून, 1 जूनपासून मंदिर खुले होणार का याबाबत अजूनही अनिश्चितता कायम आहे.

नाशिक जिल्ह्यात होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यादरम्यान वाढणारी भाविकांची गर्दी लक्षात घेऊन मंदिर परिसरात 288.17 कोटी रुपयांचा मोठा विकास आराखडा राबवला जात आहे. यामध्ये नवीन भव्य सभामंडप, विस्तारित पायरी मार्ग, भाविक सुविधा केंद्रे, सुरक्षा व्यवस्था आणि संपूर्ण परिसराचे आधुनिकीकरण यांचा समावेश आहे.
श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिर हे मंदिर 9 जानेवारी 2026 पासून भाविकांसाठी बंद ठेवण्यात आले आहे. प्रशासनाने स्पष्ट केले आहे की 31 मे 2026 पर्यंत सर्व कामे पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवून मंदिर बंदच राहील.

दरम्यान, जिल्हा प्रशासन, बांधकाम विभाग आणि मंदिर ट्रस्टकडून आज (रविवार) संयुक्त पाहणी करण्यात आली. कामांची प्रगती, भाविकांच्या सुरक्षेची तयारी आणि सुविधांची स्थिती याचा सखोल आढावा घेण्यात आला.

मंदिर सुरू करण्यापूर्वी अनेक महत्त्वाच्या सुविधा पूर्ण करण्याच्या मागण्या समोर आल्या आहेत. महाद्वार ते पायरी मार्गावर स्टील बॅरिकेटिंग, नवीन शेडपर्यंत सुरक्षित मार्ग, तसेच हनुमान मंदिर ते एक्झिट गेटपर्यंत स्वतंत्र भाविक मार्ग व्यवस्था करण्यावर भर दिला जात आहे.
तसेच कामांदरम्यान काढलेले CCTV कॅमेरे, लाईटिंग व्यवस्था आणि PA सिस्टीम पुन्हा सुरू करणे, परिसराची स्वच्छता, पाणी साचू नये यासाठी ड्रेनेज व्यवस्था आणि पायरी मार्गावर मजबूत आच्छादन यांची मागणी करण्यात आली आहे. सभामंडपातील दरवाजांना लॉक व्यवस्था बसवणे आणि VIP दर्शन व्यवस्थेवर मर्यादा आणणे यासारख्या सूचनाही आहेत.
सर्व कामे 31 मेपूर्वी पूर्ण करणे अत्यावश्यक असल्याचे देवस्थानने स्पष्ट केले आहे. त्यामुळे मंदिर पुन्हा कधी खुले होणार याकडे राज्यभरातील भाविकांचे डोळे लागले आहेत. प्रशासनाच्या अंतिम निर्णयानंतरच भीमाशंकरचे दरवाजे पुन्हा भाविकांसाठी उघडतील की नाही हे स्पष्ट होणार आहे.