पाणी वाया घालवाल तर खबरदार! 25 हजारांपर्यंत दंड, दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाचा मोठा निर्णय; काय आहे अपडेट?


जालना : राज्यातील दुष्काळी परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असताना प्रशासनाकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. जालना शहर महानगरपालिका प्रशासनाने पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर कठोर निर्णय घेतला असून, पाण्याचा अपव्यय करणाऱ्या नागरिकांवर आता 5 हजार ते 25 हजार रुपयांपर्यंत दंड आकारण्यात येणार आहे. याबाबतचे आदेश महापालिका आयुक्त अंजली शर्मा यांनी जारी केले आहेत.

घरगुती नळ जोडणीच्या तोट्या तसेच अंतर्गत जलवाहिनीला गळती असल्यास ती 15 ऑक्टोबरपर्यंत दुरुस्त करून घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच पाणी भरल्यानंतर नळ तात्काळ बंद करावेत, असेही आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.

महानगरपालिकेच्या जलवाहिनीवरून पाणी खेचण्यासाठी विद्युत मोटार लावणे, रस्त्यावर वाहने धुणे किंवा घरासमोरील रस्ता पाण्याने धुणे अशा प्रकारे पाण्याचा अपव्यय केल्याचे आढळल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. तसेच संबंधितांविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही प्रस्तावित करण्याचा इशाराही प्रशासनाने दिला आहे.

त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा वापर काटकसरीने करावा आणि पाण्याची नासाडी टाळावी, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

भोकरदनमध्ये दुष्काळी पिकांचे पंचनामे सुरू

जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील आन्वा महसूल मंडळात दुष्काळामुळे नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करण्याच्या कामाला वेग आला आहे. तलाठी, ग्रामसेवक आणि कृषी सहाय्यक यांच्या संयुक्त पथकांकडून शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पिकांची पाहणी केली जात आहे.

रेणुकाई पिंपळगाव, पारध यासह परिसरातील अनेक गावांमध्ये पंचनामे करण्यात आले आहेत. जिल्ह्यात गेल्या दीड ते दोन महिन्यांपासून पावसाने मोठी ओढ दिल्याने सोयाबीन, कपाशी आणि इतर खरीप पिकांना मोठा फटका बसला आहे. दुष्काळ जाहीर झाल्यानंतर प्रशासनाने नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश दिले होते.

बदनापूर तालुक्यातही पिकांची पाहणी

बदनापूर तालुक्यातील गेवराई बाजार आणि परिसरातील विविध गावांमध्ये दुष्काळी पिकांचे पंचनामे सुरू आहेत. तलाठी, कृषी सहाय्यक आणि ग्रामसेवक यांच्या संयुक्त पथकांकडून शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन पिकांची पाहणी केली जात आहे.

पावसाने मोठी ओढ दिल्याने सोयाबीन, कपाशी आणि इतर खरीप पिकांचे नुकसान झाले आहे. पिकांची सद्यस्थिती, नुकसानीचे प्रमाण आणि दुष्काळामुळे निर्माण झालेली परिस्थिती याची पाहणी करून पंचनामे करण्यात येत आहेत.

चारा संकटामुळे दुग्ध व्यवसाय अडचणीत

धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यातही दुष्काळाचा परिणाम आता पशुधनावर होऊ लागला आहे. पाऊस नसल्याने ओला चारा संपला असून, दूध उत्पादक शेतकऱ्यांसमोर चाऱ्याचे मोठे संकट निर्माण झाले आहे.

गेल्या दोन महिन्यांपासून पाऊस नसल्याने शेतकऱ्यांकडे केवळ दहा ते बारा दिवस पुरेल एवढाच चारा शिल्लक असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे सरकारने तातडीने जनावरांसाठी चाऱ्याची व्यवस्था करावी, अशी मागणी दूध उत्पादक शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

यवतमाळमध्ये सोयाबीन उत्पादनात मोठी घट

यवतमाळ जिल्ह्यातही पावसाअभावी खरीप हंगामाला मोठा फटका बसला आहे. सध्या जिल्ह्यात सोयाबीन पीक कापणी प्रयोग सुरू असून, यवतमाळ तालुक्यातील बोरगाव येथे जिल्हाधिकारी विकास मीना यांच्या उपस्थितीत शेतकरी नरेश बाजीराव गावंडे यांच्या शेतातील सोयाबीन पिकाची कापणी आणि मळणी करण्यात आली.

दुष्काळजन्य परिस्थितीचा परिणाम उत्पादनावर स्पष्टपणे दिसून आला असून, या प्रयोगात प्रति हेक्टरी केवळ 1.09 क्विंटल सोयाबीन उत्पादन मिळाले. त्यामुळे यंदाच्या खरीप हंगामात शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!