सावधान!! बाणेर टेकडीवर इंजिनिअरला लुटलं, तिघांनी अडवून धमकावलं अन्…; पुण्यात धक्कादायक प्रकार

पुणे : पुण्यात बाणेर टेकडीवर एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. नोकरीनिमित्त पुण्यात स्थायिक झालेला कोरियन अभियंता बाणेर टेकडीवर फिरायला आलेला असताना चोरट्यांनी त्याला लुटल्याची घटना घडली. यामुळे सुरक्षेचा प्रश्न उपस्थित झाला आहे. चोरट्यांनी त्याच्याकडील महागडा मोबाइल काढून घेतला.

याबाबत तरुणाने बाणेर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यावरून चोरट्यांविरुद्ध बाणेर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस तपास करत आहेत. तक्रारदार मूळचा कोरियातील असून, सध्या बालेवाडी भागात सहकाऱ्यांसोबत राहतो. याबाबत माहिती अशी की, सकाळी बाणेर परिसरातील तो टेकडीवर फिरायला गेला होता.
यावेळी तिघांनी तरुणांना अडवले. त्यांना धमकावत महागडा मोबाइल हिसकावून घेतला. बाणेर टेकडी आणि पाषाण येथील टेकडीवर फिरायला आलेल्या नागरिकांना लुटण्याच्या घटना गेल्या वर्षी घडल्या होत्या.

दरम्यान, बोपदेव घाटातील बलात्काराच्या घटनेनंतर टेकड्यांच्या सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर प्रणाली विकसित करण्यात येत आहे. त्याची चाचणी सध्या सुरू आहे. यामुळे गुन्हेगारांना आळा बसेल. पहिल्या टप्प्यात बोपदेव घाटात बसवली जाणार आहे. वरिष्ठ निरीक्षक चंद्रशेखर सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.