Beed : सर्वसामान्यांचे ३०० कोटी बुडवले, राजस्थानी मल्टीस्टेट घोटाळ्यात संचालकाला पुण्यातून ठोकल्या बेड्या…

Beed : मागील काही वर्षामध्ये केबीसी घोटाळा आणि अन्य आर्थिक घोटाळे, चिटफंड घोटाळा समोर आले आहे. ज्यामध्ये अनेकांच्या आयुष्यभराची कमाईला चुना लावून अनेकांनी हा पैसा देशाबाहेर पाठवल्याचे समोर आले आहे.
सध्या बीडमधून मल्टीस्टेटच्या घोटाळ्यांचा फेरा वाढताना दिसत असून ज्ञानराधा मल्टीस्टेट प्रकरण ताजे असतानाचा आता राजस्थानी मल्टीस्टेट घोटाळ्यासंदर्भात बीड आर्थिक गुन्हा शाखेने मोठी कारवाई केली.
राज्यस्थानी मल्टीस्टेटचा संचालक अभिषेक बियाणीला पुण्यातून बीडच्या आर्थिक गुन्हे शाखेने आज पहाटे ताब्यात घेतले आहे.मागच्या अनेक महिन्यांपासून मल्टिस्टेट प्रकरणातील आरोपी बीड पोलिसांना गुंगारा देण्यात यशस्वी ठरत होते.
अनेक तक्रारीनंतर आर्थिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली. त्याला आता बीडला घेऊन येणार असून राजस्थानी मल्टीस्टेट प्रकरणातील तपासला आता वेग येणार आहे. राजस्थानी मल्टीस्टेट प्रकरणी लातूर, परळी, नांदेड, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यात गुन्हे दाखल आहेत. Beed
बीड मधील राजस्थानीसह ज्ञानराधा, जिजाऊ यासह अनेक मल्टीस्टेटमध्ये गुंतवणूकदारांचे पैसे अडकलेले आहेत. बीड जिल्ह्यातीलच ज्ञानराधा मल्टीस्टेटमध्ये ठेवी अडकल्यानंतर बँकेचे उपाध्यक्ष यशवंत कुलकर्णीना पुण्यातून अटक झाली होती. दरम्यान, आज राजस्थानी मल्टीस्टेट संदर्भात पुण्यातूनच अभिषेक बियाणी याला अटक झाली आहे.
दरम्यान, राजस्थानी मल्टीस्टेटचे अध्यक्ष चंदुलाल बियाणी यांच्यासह अख्खे संचालक मंडळच या घोटाळ्यात सामील होते. यात ठेवीदारांचे जवळपास ३०० कोटी रुपये बुडवत बीडच्या परळीतील मुख्य शाखेसह सर्व शाखा बंद करत पोबारा केल्याची संतापजनक घटना घडली होती. कष्टाचा पैसा बुडण्याच्या स्थितीत आल्याने ठेवीदारांमध्ये संतापाची लाट उसळली होती. त्यातील १७ जणांवर फसवणूकीचा गुन्हाही दाखल करण्यात आला होता.